सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कऱ्हाडातील कृष्णा नाक्यावर वाघ आणि बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून अकरा नख्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. दिनेश बाबूलालजी रावल (वय ३८, रा. सोमवार पेठ, कऱ्हाड) व अनुप अरुण रेवणकर (वय ३६, रा. रविवार पेठ, कऱ्हाड) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
.कऱ्हाडातील दोघांकडे वाघ आणि बिबट्याच्या नख्या असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून सोमवारी सहायक वनसंरक्षक झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे निरीक्षक डोकी आदीमाल्ल्या, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह पथकाने सापळा रचला. नख्या खरेदी करण्याचा बहाणा करीत या पथकाने आरोपींशी संपर्क साधला. तसेच कृष्णा नाक्यावरील सावित्री कॉर्नर इमारतीत व्यवहार करण्याचे ठरले. त्यानुसार सोमवारी सायंकाळी दिनेश रावल हा काही नख्या घेऊन त्याठिकाणी आला. वन विभागाच्या पथकाने तातडीने त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या साथीदाराची आणि इतर नख्यांची माहिती घेतली. त्यावेळी अनुप रेवणकर याचे नाव निष्पन्न झाले. वन विभागाच्या पथकाने शहरातील काझी वाड्याजवळ असलेल्या मयुर गोल्ड दुकानावर छापा टाकून रेवणकरलाही तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडून नऊ आणि दिनेश रावल याच्याकडून दोन अशा अकरा नख्या पथकाने हस्तगत केल्या. वनरक्षक आकाश सारडा, वनपाल आनंदा सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, अरुण सोळंकी, संजय लोखंडे, प्रशांत मोहिते, अशोक मलप, साधना राठोड, मंगेश वंजारे, बाबुराव कदम, भारत खटावकर, सचिन खंडागळे, राजकुमार मोसलगी, राम शेळके यांनीही या कारवाईत सहभाग घेतला.
You must be logged in to post a comment.