साताऱ्यात दोन दिवसात सुमारे साडेतीनशे विक्रेत्यांचे स्वॅब

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा)  : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार सातारा पालिकेच्यावतीने शहरातील सर्व हातगाडीधारक, व्यापारी व विक्रेत्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जे विक्रेते चाचणी करणार नाहीत अशांना व्यवसायास परवानगी दिली जाणार नाही, असे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. करोना चाचणीस प्रारंभ झाला असून दोन दिवसात सुमारे साडेतीनशे विक्रेत्यांचे स्वॅब घेण्यात आले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांच्या संख्येत वाढ होउ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत चालली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांमध्ये सातत्याने जागृती करत आहे. आता पालिका प्रशासनाने शहरातील सर्व व्यापारी, विक्रेते, हातगाडीधारक व कर्मचाऱ्यांना करोना चाचणी बंधनकारक केली आहे.
पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय व गोडोली येथील प्राथमिक नागरिक आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवन स्टार इमारतीत शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात विक्रेते, व्यापाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. दोन दिवसात सुमारे साडेतीनशे हातगाडीधारक व व्यापाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठीघेण्यात आले.

जे विक्रेते, व्यापारी चाचणी करून घेणार नाहीत अशांना कोणत्याही परिस्थितीत व्यवसायास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधितांनी प्राधान्याने चाचणी करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!