![](https://i0.wp.com/bhumishilp.com/wp-content/uploads/2023/08/p1big.jpg?resize=1024%2C768&ssl=1)
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच शेतकरी आर्थिकदृष्टया मजबूत करणेसाठी वेळेत व माफक व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध होणे आवश्यक आहे ही सामाजिक गरज यशवंतरावजी चव्हाणसाहेब, बाळासाहेब देसाई, आर डी. पाटील, किसन वीर इत्यादी दृष्ट्या व दूरदृष्टी असलेल्या समाज धुरिणांनी जाणली. त्याचीच फलश्रुती म्हणून सन १९४५ मध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निर्माण करावी, असा विचारप्रवाह सुरु झाला.
सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी ८ जून १९४६ रोजी कराडमध्ये विचारविनिमय केला. स्वातंत्र्यानंतर त्यावेळचे लोकल बोर्डाचे अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे अध्यक्षतेखाली दि. १३/११/१९४८ रोजी बैठक झाली. सहकार खात्याशी चर्चा करुन बँकेच्या स्थापनेसाठी अनुकुलता निर्माण व्हावी म्हणून प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ निश्चित करण्यात आले. दि. २०/०१/१९४९ रोजी सहकार बोर्डाच्या कार्यालयात सभा झाली. बँकेसाठी भागभांडवल गोळा करण्यासाठी जिल्हा दौरा निश्चित झाला. प्रत्येक तालुक्यासाठी भागभांडवल जमा करणेसाठी उद्दिष्ट ठरविणेत आले. भागभांडवल गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण प्रयत्न केले. विशेषत: देशभक्त आबासाहेब वीर, रघुनाथराव पाटील, भि. दा. भिलारे (गुरुजी) यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दि. ११/८/१९४९ रोजी सहकार खात्याकडे नोंदणी करण्याचा प्रस्ताव दाखल झाला. आवश्यक असणारे रु. २ लाख भाग भांडवल जमा झाले. दिनांक १५ ऑगस्ट १९४९ रोजी बँकेची स्थापना झाली व दि. १५/११/१९४९ रोजी बँकेस रजिस्ट्रेशन प्राप्त झाले.
![](https://i0.wp.com/bhumishilp.com/wp-content/uploads/2023/08/image-14.jpg?resize=377%2C166&ssl=1)
बँकेचे पहिले संचालक मंडळ अस्तित्वात आले. बँकेचे पहिले चेअरमन म्हणून बाळासाहेब देसाई आणि व्हाईस चेअरमन म्हणून निळकंठराव कल्याणी यांची निवड झाली. दि.११/११/१९५० रोजी मुंबई राज्याचे गृहमंत्री मा. ना. मोरारजी भाई देसाई यांचे शुभहस्ते या बँकेच्या कामकाजाचा शुभारंभ सातारा येथील कन्या शाळेजवळच्या एका जुन्या घरात झाला. बळीराजाचे हितासाठी बँकेचे कामकाज सुरु झाले. शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी अल्पमुदत कर्जपुरवठा सुरु केला तसेच जिल्हयातील ग्रामीण व नागरी जनतेला बँकिंग सुविधा उपलब्ध करुन दिल्या. अल्पमुदत पीक कर्जाबरोबरच बँकेने कृषि व कृषी पुरक प्रत्येक कारणासाठी मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा सुरु केला. यामध्ये प्रामुख्याने १९६२ मध्ये जिल्हयात दुध उत्पादनाची दुधाची महापूर योजना प्रभावीपणे राबविताना सं. गाई, मुऱ्हा मेहसाना म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांकरीता कर्जपुरवठा सुरु केला. प्रगतीदर्शक वाटचालीमुळे स्वतंत्र इमारतीची गरज निर्माण झाली. शिवाजी सर्कल, सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ‘किसान भवन’ ही प्रशस्त वास्तू बांधण्यात आली. या वास्तुचे उद्घाटन यशवंतरावजी चव्हाण, तत्कालीन संरक्षण मंत्री, भारत सरकार व बाळासाहेब देसाई, तत्कालीन गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते दि. ०७/०४/१९६६ रोजी झाले.
सन १९७१ ते १९८१ या दशकात सह्याद्री, कृष्णा, अजिंक्यतारा, किसन वीर सहकारी साखर कारखाने उभारणीसाठी बँकेने अर्थसहाय्य उपलब्ध केले. तसेच बँकेच्या अर्थसहाय्यातून जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा संस्था उभ्या राहील्या. कोरडवाहू क्षेत्र बागायती झाले. यामुळे हरित क्रांती होवून, शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी कर्ज उपलब्ध केलेमुळे ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली व साखर कारखान्याच्या ऊसाच्या गरजेचा प्रश्न सुटण्यांस मदत झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा विकास होऊन कृषी औद्योगिक क्षेत्रात वाढ झालेने अंतिम लाभार्थी असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी व छोट्या व्यावसायिकांचा आर्थिक विकास करणेस मदत झाली. यशवंतराव चव्हाण साहेबांचे कृषी व औद्योगिक विकासाचे स्वप्नं खऱ्या अर्थाने साकार झाले.
सन १९८१ ते १९९१ च्या दशकात जिल्ह्याच्या बागायत क्षेत्रात वाढ होणेसाठी बँकेने इलेक्ट्रिक मोटर पंपसेट, पाईपलाईन, लघुसिंचन योजनांसाठी कर्ज पुरवठा सुरु केला. शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, कमी क्षेत्रात, कमी मनुष्यबळात व कमी पाण्यात जास्तीत उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळावा या दूरदृष्टी विचाराने बँकेच्या मा. संचालक मंडळाने केंद्र शासन, नाबार्ड व महाराष्ट्र शासन यांचे मार्गदर्शन व मान्यतेने इस्राईल ते अमेरिका सारख्या अत्याधुनिक शेती करणाऱ्या देशांचा अभ्यास दौरा करून, विविध प्रकारच्या शेती प्रकल्पांचा व पूरक उद्योगांचा अभ्यास केला व त्यास अनुसरून जिल्ह्यातील पारंपारिक शेतीमध्ये उच्चतंत्रज्ञानाची व व्यवसाईक दृष्टिकोनाचा क्रांतिकारी बदल घडवून आणनेचेदृष्टीने विविध योजना कार्यान्वित केल्या. जिल्यातील पारंपारिक शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करणे या योजनांची व्याप्ती विचारात घेऊन बँकेने १९८८ साली तांत्रिक देखरेख आणि मुल्यांकन (टी. एम. ई.) विभागाची स्थापना केली. पाण्याच्या बचतीसाठी व जादा उत्पादनासाठी ठिबक व तुषार सिंचन योजना कार्यान्वित केल्या. शेती व्यवसायातील मनुष्यबळाची कमतरता विचारात घेवून बँकेने कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मळणीयंत्र, पेरणी यंत्र, पीक काढणी यंत्र, औषध फवारणी यंत्र इत्यादिसाठी कर्जपुरवठा सुरु केल्या. शेतकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी शेतकरी निवास कर्ज योजना कार्यान्वित केली. सन १९९६ मध्ये बँकेने हायटेक विभाग सुरू करून उच्च तंत्रज्ञानाची शेती करण्याचा मूलमंत्र शेतकऱ्यांना दिला. यामुळे ग्रीन हाऊसमधून जरबेरा, कार्नेशन इत्यादी फुलशेतीबरोबरच रंगीत ढोबळी मिरचीच्या उत्पादनातून अशा शेतीमालाला देशांतर्गत मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. उत्पादित मालाला अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या `अजिंक्यतारा फळे, फुले व भाजीपाला खरेदी विक्री सहकारी संस्थेमार्फत’ देशांतर्गत व परदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन देऊन लक्षणीय कामकाज केले. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी कृषी कार्याची व विचारांची ही नांदीच ठरली. सातारा जिल्हा हा ‘ग्रीन हाऊसचा जिल्हा’ म्हणून ओळखला गेला.
जिल्ह्यातील शेतक-यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, याकरिता बँकेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील प्रगतीशील शेतक-यांना एकत्रित करून जिल्ह्यात ६५० शेतकरी मंडळाची स्थापना केली. तसेच “यशवंत किसान विकास मंच” स्थापन केला. या मंचाद्वारे प्रगत शेतक-यांच्या शेतावर शिवार फेरीचे आयोजन करू शेतक-यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने उत्पादन वाढीसाठी शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष माहिती दिली जाते.
जिल्ह्यामध्ये १०.५० लाख महसुली खातेदार असून, त्यापैकी ६ लाख ४९ हजार सोसायटीचे सभासद असून त्यापैकी ३ लाख ५० हजारहून अधिक शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीक तसेच शेतीपूरक कर्ज पुरवठा विकास संस्थांचे माध्यमातून केला जात आहे. शेतक-यांना रुपये तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध करून देणारी जिल्हा बँक ही राज्यात नव्हे तर देशातील पहिलीच बँक आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही ३.०० लाखापर्यंत ‘शून्य टक्के’ व्याजदराने पिक कर्ज उपलब्ध करणेचे धोरण स्वीकारले आहे. सन २०१०-२०११ सालापासून या करिता बँकेने आजपर्यंत रुपये ३२.२० कोटी इतकी रक्कम बँकेचे नफ्यातून शेतक-यांना आदा केली आहे. तसेच बँकेने मध्यम व दीर्घ मुदती कर्जामध्ये वेळेत परतफेड केलेल्या शेतक-यांना ४ ते ८ टक्केपर्यंत व्याज सवलत दिली आहे. जिल्हाच्या वार्षिक पत आराखडयामध्ये जिल्हा बँकेचा कृषी कर्ज पुरवठयाचे उद्दिष्ट ५० टक्के हून अधिक व जिल्ह्याचे पुर्ततेतील वाटा हा सतत ७० टक्के पेक्षा जास्त राहिलेला असून बँकेस दिलेल्या उदीष्टाची पूर्तता नेहमीच १०० टक्के हून अधिक केलेली आहे.
![](https://i0.wp.com/bhumishilp.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230814-WA0020-5.jpg?resize=655%2C1024&ssl=1)
शेती व शेतीपूरक व्यवसायाव्यतिरिक्त व्यक्ती ग्राहकांना अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने सन १९९७ साली बँकेने व्यक्ती थेट कर्ज विभाग कार्यान्वित केला. या विभागांतर्गत ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन सायकल खरेदी पासून ऊस तोडणी यंत्रा करिता कर्ज पुरवठा करण्यासाठी जवळपास ३० हून अधिक योजना कार्यान्वित केल्या. जिल्ह्यातील शेतक-यांच्या मुलांना व्यावसायिक उच्च शिक्षण घेता यावे याकरिता शैक्षणिक कालावधी चालू असेपर्यंत शून्य टक्के दराने देशांतर्गत रुपये ३० लाख व परदेशात रु. ४०.०० लाख कर्ज पुरवठाचे धोरण स्वीकारले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या तरुणांकरिता रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, इतर मागास महामंडळ इत्यादी मंडळाच्या योजना प्रभावीपणे राबवित असून, कर्जदार सभासदांना महामंडळाचा व्याज परतावा मिळणेकामी बँकेमार्फत मदत व मार्गदर्शन केले जात आहे. तसेच व्यवसाय उभारणीसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME), प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP), मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) यासारख्या शासन पुरस्कृत विविध अनुदान व व्याज परतावा योजना “बँक आपल्या दारी” या अभियानाद्वारे ग्राहकांपर्यंत समक्ष पोहचविल्या जात आहेत.
बँकेची प्रगती व कामकाजाची वाढती व्याप्ती यामुळे कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवणेसाठी मुख्य कार्यालयात विविध विभाग कार्यान्वित करणेत आले. बँकेच्या मा. संचालक मंडळाने भविष्यवेधी विचार समोर ठेऊन नूतन प्रशासकीय इमारती साठी जिल्हा परिषदेसमोर जागा खरेदी केली आणि दि. २४/११/२००६ रोजी मा. ना. श्री. शरदचंद्रजी पवार, तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री, भारत सरकार व मा. ना. श्री. विलासराव देशमुख, तत्कालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले. आजचे भव्य देखणे वास्तुशिल्प उभे राहिले आहे. त्याबरोबरच बदलत्या बँकिंग प्रणालीमुळे प्रशिक्षणाची गरज भासू लागली असलेने बँक अधिकारी, सेवक तसेच विकास सोसायटीचे पदाधिकारी व महिला बचत गटाच्या पदाधिकारी इत्यादींचे करिता बँकेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीमध्ये “यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र” स्थापन केले.
बँकेच्या मा. संचालक मंडळाने भविष्याचा वेध घेवून पारंपारिक बँकिंग करीत असताना बँकिंग क्षेत्रामध्ये झालेल्या तंत्रज्ञानाची उत्क्रांती आत्मसात करत सन २००५ मध्ये टी.बी.ए. च्या माध्यमातून ग्राहकांना जलद गतीने सेवा उपलब्ध करून दिली. संगणक कामकाजावर नियंत्रण ठेवणेसाठी जुन्या प्रशासकीय इमारतीमध्येच स्वतःचे अद्यावत व प्रशस्त “डेटा सेंटर” उभारले.
सन २०१३ मध्ये सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणालीमध्ये जोडून ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे आधुनिक बँकिंग सुविधा व तत्पर सेवा देणेस सुरुवात केली. आरटीजीएस/ एनईएफटी/ CTS क्लिअरींग मोडयुल, ऐनीव्हेअर बँकिंग, रूपे डेबिट कार्ड, रूपे किसान क्रेडिट कार्ड, तसेच वुमन्स कार्ड, स्टुडंट कार्ड, एस. एम . एस . बँकिंग, मोबाईल बँकिंग, IMPS, ABPS,UPI इत्यादी सुविधा सुरू करून ग्राहकांना कॅशलेस बँकिंग साठी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
बँकेने ग्राहकांना नेट बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली असून याव्दारे ग्राहकांना खात्याचा उतारा, व्यवहार करणेची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्राहकांना फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, ई-कॉमर्स इत्यादि सर्व व्यवहार घरबसल्या काही क्षणात करता येणार आहेत. गुगल पे, फोनपे, पेटीएम, अॅमेझोन या प्रकारचे अॅप्लीकेशनद्वारे मोठया प्रमाणात जलद डिजीटल व्यवहार करता येत आहेत. बँकेने व्यावसायिक, दुकानदार, विक्रेते यांचे करिता QR कोड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. शेतकरी सभासदांकारिता बँकेने ७/१२ व खाते उतारा सर्व शाखामधून मिळणेकरिता सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँकेने बँकिंग प्रणाली मधील माहिती तंत्रज्ञानाचे सर्व लाभ ग्राहकांना देणेकरीता तसेच सायबर क्राईम चे वाढते धोके विचारात घेऊन अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक असे इन्फोसिस या नामांकीत कंपनीचे कोअर बँकिंगचे सॉफ्टवेअर कार्यान्वित करणेची कार्यवाही सुरु आहे.
बदलत्या अत्याधुनिक संगणकीकरण युगामध्ये सहकार क्षेत्र मागे राहू नये यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सर्व सहकारी संस्था संगणकीकृत व्हाव्यात, संस्थांचे कामकाजामध्ये पारदर्शकता, गती व सुसूत्रता यावी, सर्व विकास संस्थाना एकच सॉफ्टवेअर असावे यासाठी विशेष मोहीम आखली आहे. यामध्ये सातारा जिल्हा बँकेच्या एकूणच कामकाजाचा विचार होऊन प्राधान्याने बँकेशी सलग्न असलेल्या ९६० संस्थांपैकी ६६३ विकास संस्थाची पहिल्या टप्यातच संस्था संगणकीकरणासाठी निवड केली आहे. सदर संस्थाना संगणक व इतर साहित्य प्राधान्याने उपलब्ध करून दिले जाणार असून, संस्था संगणकीकरणासाठी व त्यांचे प्रशिक्षणासाठी सातारा जिल्हा बँकेची मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे.
बँक स्वतःच्या प्रगती बरोबरच सलग्न विकास संस्थांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून, सभासद पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली करणा-या विकास संस्थांना दरवर्षी बँकेच्या नफ्यातून वसुली बक्षीस म्हणून प्रत्येक संस्थेस रु. ३० हजार इतका निधी दिला जात आहे. सन २००८-०९ पासून आत्तापर्यंत बँकेने सलग्न विकास संस्थाना प्रत्येकी रु. २ लाख ८३ हजार ३०० प्रमाणे वसुली प्रमाणे प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे संस्थांचे भाग भांडवलात वाढ होवून संस्था सक्षम होण्यास मदत झाली आहे. विकास संस्था सक्षमीकरण करणेसाठी सभासदांना कर्ज वाटपा व्यतिरिक्त इतर व्यवसाय करून संस्था सक्षम करणेसाठी नाबार्ड पुरस्कृत PACS to MACS योजनेंतर्गत विविध व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन करून, नाबार्डच्या माध्यमातून अल्प व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध करून देत आहे. जिल्हयामध्ये एकूण ९६० विकास सेवा संस्था असून त्यांचे व्यवस्थापन खर्चावर नियंत्रण, व्यवसाय वृध्दी, कर्जवाटपामध्ये भरघोस वाढ, प्रभावी वसुली संस्था सक्षम होणेसाठी इतर व्यवसाय सुरु करणे याविषयी मार्गदर्शन केलेमुळे चालू आर्थिक वर्षाखेर बँकेच्या ९४० विकास सोसायटया नफ्यात आणणेत बँकेस यश मिळाले असून भविष्यात सर्व विकास संस्था नफ्यात आणण्याचा बँकेचा मानस आहे.
महिला सबलीकरण व सक्षमीकरणाअंतर्गत ३२ हजार ६४९ स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन करणेत आले आहेत, पैकी जवळपास १८ हजार हून अधिक गटांना रु. ३५ कोटीहून अधिकचा कर्ज पुरवठा करणेत आला आहे. सन २००८ पासून राज्यात सर्वप्रथम ४ टक्के इतक्या अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणारी सातारा जिल्हा बँक ही देशातील एकमेव बँक आहे. यामुळे बचत गटांचे लघुउद्योग व्यवसायाला चालना मिळाली आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत प्रत्येकी रु. २.०० लाखाचे विमा संरक्षण उपलब्ध केले आहे. या योजनेंतर्गत बँकेने आजअखेर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये २ लाख ५९ हजार व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये ७१ हजार २१६ खातेदारांना सहभागी करून घेतले आहे. त्यापैकी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत असणारी प्रिमिअमची रक्कम बँकेने स्व नफ्यातून तरतूद करून ग्राहकांच्या खात्यावर जमा करून मोफत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आज अखेर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून १५४ शेकऱ्यांच्या वारसांना रु. ३ कोटी ८ लाख इतक्या रक्कमेचा लाभ देणेत आला आहे. तर, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून ३५० शेतकऱ्यांच्या वारसांना रु. ७ कोटी इतका लाभ देणेत आला आहे. या योजने अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना सहभागी करणेचे बँकेने नियोजन केले आहे.
बँकेत पगार जमा होणारे सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, सहकारी संस्था यामधील कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पगारदार खातेदार व बँकेचे सर्व सेवक यांच्यासाठी अत्यल्प प्रिमियम मध्ये बँकेने एकत्रित वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी सुरू केली आहे. या पॉलिसी अंतर्गत अपघात विमा घेणाऱ्या व्यक्तीला अपघाती मृत्यू अथवा गंभीर अपंगत्व आल्यास वारसाला जास्तीत जास्त ३० लाख एवढी विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. बँकेने सर्व ठेवीदारांसाठी ठेवींना DICGC अंतर्गत बँकेमार्फत प्रीमिअम भरून रु. ५.०० लाखापर्यंत विमा संरक्षण दिले आहे.
बँक ज्या प्रमाणे बँक सभासद, शेतकरी व इतर ग्राहकांना विविध सेवा सुविधा व विमा संरक्षण प्रदान करणेसाठी कार्यरत राहिली आहे, त्याचप्रमाणे बँकेच्या सेवकांसाठी व त्यांचे कुटुंबियांसाठीही विशेष सुविधा व विमा संरक्षण देत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बँक सेवकांकरिता गृह कर्जावर व्याज सवलत, गंभीर आजार व अपघातासाठी विशेष रजा, बँक सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर बँकेत नोकरी हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून, कर्मचा-यांच्या वारसांना विविध माध्यमातून जवळपास ५० ते ६० लाख रक्कमेची आर्थिक मदत दिली जाते. बँक सेवकांकरिता साताऱ्यामध्ये अल्प दरामध्ये "वेणुग्राम" हा सेवकांचा गृह संकुल उभारणेचा प्रकल्प मा. संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली बँकेच्या सेवकांनी एकत्र येऊन सुरु केला आहे. सहकारातील बँक कर्मचारी साकारीत असलेला गृहनिर्माण प्रकल्प हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील नाविण्यपूर्ण प्रकल्प ठरणार आहे.
बँक सामाजिक बांधिलकी जपत असून, बँकींग कामकाजाबरोबर जिल्हयातील विकासाभिमुख कामात नेहमीच अग्रेसर असते. सन २०१७-१८ च्या दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविणेसाठी बँकेने चारा छावण्याकरिता भरीव मदत करून चारा व पशुखाद्य वाटपामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. त्यानंतर सलग दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीतही बँकेने बाधित कुटुंबाचे पुनर्वसनासाठी भरीव मदत केली आहे. सन २०२० मध्ये कोविड-१९ या जागतिक महामारीचे काळात मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकूण २ कोटी १६ लाख मदत देणेत आली आहे. तसेच बँकेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून जिल्ह्यातील स्थलांतरित, मोल मजुरी करणारे मजूर व गरजू कुटुंबाना त्यांचे दैनंदिन उदरनिर्वाहासाठी वाटप करणेत आले आहे. यासाठी रक्कम रुपये १ कोटी खर्च केले आहेत. जिल्हयाच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करणेसाठी रुपये ३.०० कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
कोरोना काळात बँकेच्या वयोवृध्द पेन्शनर ग्राहकांना व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असलेल्या ग्राहकांना बँक सेवकामार्फत घरपोहोच पेन्शन रक्कम दिली गेली आहे. सातारा येथे नव्याने सुरु झालेल्या मेडिकल कॉलेजसाठी रक्कम रु. १५ लाखाची मदत केलेली आहे. बँकेने २०१८ साली पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना जलसंधारनासाठी रुपये १ कोटी, २०१९ साली सातारा जिल्ह्यात भीषण दुष्काळामध्ये पाणी टंचाईचे काळांत रुपये २ कोटी खर्च करून दुष्काळग्रस्त भागात टॅकरने पाणी वितरण करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. जलसंधारणाचे कामात अग्रेसर असलेल्या कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी येथे बँकेचे मा. संचालक तसेच अधिकारी व सेवक यांनी समतोल बांध घालणे व चारी खोदाणेसाठी श्रमदान करणेत सहभाग घेतला आहे.
गत ५ वर्षामध्ये बँकेस नैसर्गिक तसेच मानवीय अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामध्ये प्रामुख्याने २०१६ मध्ये झालेली नोटाबंदी, सन २०१७-१८ मधील दुष्काळ, सन २०१९ मध्ये झालेली अतिवृष्टी, सन २०२० पासून सुरु झालेली कोरोना महामारी, पुन्हा सन २०२१ मध्ये झालेली अतिवृष्टी या अनेक अडचणी आल्या. परंतु, बँकेचा भक्कम पाया व मा. संचालक मंडळाची दूरदृष्टी यामुळे बँक अधिक सक्षमपणे उभी राहून जिल्ह्यातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत ३०७ शाखा व १२ विस्तारीत कक्ष, ६५ एटीएम, सलग्न ९६० विकास सेवा संस्थां तसेच मोबाईल बँकिंग एटीएम व्हॅन व ६५० मायक्रो एटीएम मशीन च्या माध्यमातून दुर्गम डोंगरी भागातील ग्राहकांना सर्व प्रकारच्या अविरत बँकिंग सुविधा घरपोहोच व जागेवरच उपलब्ध करून दिल्या आहेत.
सेवेतील सातत्य व कामकाजातील गुणवत्ता यामुळे देशातील व परदेशातील विविध मान्यवर, बँकिंग व सहकारी क्षेत्रातील संस्था यांना रिझर्व्ह बँक, नाबार्ड व देशपातळीवरील महत्वपूर्ण आर्थिक संस्था यांचेमार्फत सातारा जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीचा अभ्यासासाठी वेळोवेळी भेटी देत असतात. बँकेच्या अनिष्ठ तफावत तसेच अनुत्पादक कर्जे व्यवस्थापनाचा अभ्यास “बर्ड” लखनौ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नाबार्ड संचालित संस्थेने केला असून बँकेचे धोरण राष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आले आहे.
बँकेच्या एकूणच दैदिप्यमान प्रगतीचा आढावा घेतला असता पहिले वर्ष वगळता बँक स्थापनेपासून नफ्यात असून, बँकेस सतत ऑडीट वर्ग ‘अ’ आहे. बँकेचे २ लाखाने सुरु केलेले भागभांडवल ७ दशकाच्या वाटचालीनंतर २८७ कोटींहून अधिक झाले आहे. बँकेचा सुरुवातीचा व्यवसाय १५ लाख होता तो ७ दशकांच्या वाटचालीनंतर १५ हजार कोटींहून अधिक झाला आहे. बँकेने सन १९६२ पासून सभासदांना ४ टक्केने लाभांश वाटपास सुरुवात केली असून जास्तीत जास्त २० टक्केपर्यंत लाभांश वाटप केला आहे. सन १९९२ पासून सतत २१ वर्षे बँकेने १० टक्केहून अधिक लाभांश वाटप केला आहे. बँकेचा निव्वळ एन पी ए सतत १६ वर्ष ‘शून्य’ टक्के आहे. बँकेची वसुली टक्केवारी कायमच ९५ टक्केहून अधिक असून, सामाजिक बांधिलकी जपत, अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सुविधांच्या माध्यमातून अविरत ग्राहक सेवा इत्यादी बँकेची ठळक वैशिष्ठ्ये आहेत.
याचीच फलश्रुती म्हणून बँकेस नाबार्ड, केंद्र शासन, राज्य शासन, महाराष्ट्र राज्य बँक्स असोसिएशन तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थांकडून आज अखेर १०४ पुरस्कारांनी गौरविले आहे. यामध्ये नाबार्डचे सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेचे ७ पुरस्कार बँकेस प्राप्त झाले आहेत. ‘एका दशकातील सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय सहकार मंत्री मा. ना. अमित शाह यांचे शुभहस्ते नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक प्रदान करणेत आला. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नोंद झाली आहे. बँकेस आयएसओ ९००१:२०१५ या आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे.
एकूणच बँकेच्या सात दशकाच्या वाटचालीत बँकेचे नेतृत्व केलेल्या विलासराव पाटील (उंडाळकर), केशवराव पाटील, श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील, भि. दा. भिलारे (गुरुजी), बकाजीराव पाटील, सुरेश वीर, दादाराजे खर्डेकर, विलासराव पाटील (वाठारकर), सदाशिवराव पोळ या मान्यवरांचे मोलाचे योगदान आहे.
जिल्हयाची कृषी व ग्रामीण विकासाची मातृसंस्था व अर्थवाहिनी असणा-या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशस्वी वाटचालीमध्ये जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांचे भक्कम नेतृत्व व मार्गदर्शन लाभलेमुळे बँकेची सर्वांगीण प्रगती झाली आहे. अनुभवी संचालक मंडळ, कार्यक्षम प्रशासन, उत्कृष्ट निधी व्यवस्थापन, पारदर्शक कारभार आणि भविष्यवेधी सकारात्मक धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी याव्दारे बँकेच्या उत्कर्षाचा आलेख कायम चढता ठेवला आहे. बँकेचे घोषवाक्य “उध्दरेदात्मनात्मानम्” म्हणजे स्वतःबरोबर दुसऱ्यांचा उद्धार करणे याला अर्थ प्राप्त झाला.
बँकेचे जेष्ठ संचालक व विधान परिषदेचे माजी सभापती मा. आ. रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व माजी सहकार व पणन मंत्री मा. आ. बाळासाहेब पाटील, संचालक मा. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, संचालक मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. आ. मकरंद पाटील, विद्यमान अध्यक्ष मा. नितीन पाटील, उपाध्यक्ष मा. अनिल देसाई तसेच बँकचे सर्व संचालक मंडळ आणि बँकेचे अभ्यासू मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचे कल्पक मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. यापुढील काळातही बँकेची यशस्वी घोडदौड अधिक वेगाने सुरु ठेवणेचे दृष्टीने काही भविष्यवेधी योजना आखल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेपर लेस बँकिंग, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत कृषी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, मूल्यवर्धन साखळी निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात दुप्पट वाढ करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे, शेतकऱ्यांच्या कृषी माल निर्मितीसाठी चालना मिळावी म्हणून प्रयत्न करणे, सोसायट्यांना साठवणूक गृह निर्मितीसाठी मदत करणे यांचा समावेश केला आहे.
![](https://i0.wp.com/bhumishilp.com/wp-content/uploads/2023/08/image-14-1.jpg?resize=674%2C298&ssl=1)
![](https://i0.wp.com/bhumishilp.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230814-WA0020-3.jpg?resize=655%2C1024&ssl=1)
You must be logged in to post a comment.