साताऱ्यातील वाहतूक पोलिसांची दिव्यांगास कुबड्यांची भेट ; पोलिसांनी कर्तव्यासोबतच जपली माणुसकी

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : पोवई नाका येथील वर्दळीच्या ठिकाणी हाताच्या आधारावर खुर्डत रस्ता ओलांडणार्‍या दिव्यांग बांधवास सातारा वाहतुक शाखा पोलीस कर्मचार्‍यांनी माणुसकीचा आधार दिल्याने त्याचा दैनंदिन प्रवास सुखकर झाला. कर्तव्य बजावणार्‍या सातारा वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांनी स्वखर्चाने नवीन कुबड्या विकत घेतल्या व दिव्यांगास सुपूर्द केल्या.

सातारा शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्या सोबतच नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरती ऊ न वारा पाऊ स याची तमा न बाळगता कर्तव्यदक्ष राहणार्‍या सातारा वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांना आधिकार्‍यांना अनेकदा टिकेचे लक्ष केले जात असल्याचे चित्र पहायला मिळते. दिनांक 28 डिसेंबर 2022 च्या बुधवारी पोवई नाका येथे प्रामाणिक कर्तव्य बजावत असणार्‍या विशाल मोरे, सुहास शिंदे, गौरी ढाणे, रेश्मा तांबोळी व जावळी तालुक्यातील आलेवाडी गावचे सुपुत्र पोलीस मित्र श्रीकांत पवार यांनी दिव्यांगास केलेल्या मदतीमुळे सातारा वाहतुक शाखेची मान उंचावली आहे.
दिव्यांगाची व्यथा लक्षात घेत कर्तव्यासोबत जपलेली माणुसकी आज इतरांना अनुकरणीय ठरली आहे. वाहतुकीचे नियमन करताना गरजू, पिडीतांना केलेली मदत ही सत्कारणी लागल्याने दिव्यांगाचा भविष्यातला प्रवास सुखकर झाला आहे. सातारा वाहतुक शाखेच्या वतीने शहरातील वाहतुकीचे नियंत्रण व नियमाचे काम चोख पार पाडणार्‍या वाहतुक शाखा साताराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार व त्यांच्या टिमचे जिल्ह्यात सर्वत्र कौतूक केले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,कराड येथील शेणोली स्टेशन गावचे दिव्यांग बांधव सागर बाबर हे कामानिमित्त सातारा शहरात पोवई नाका येथे आले होते. दहा वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला असल्याची माहिती वाहतुक पोलिसांना बाबर याने दिली. माझ्या घरची परिस्थिती हलाखीची असल्यामूळे मला कुबड्या घेणं शक्य होत नाही. त्यासाठी माझ्यावर हाताने खुर्डत चालण्याची वेळ आली आहे. ही बाब सातारा वाहतुक शाखेचे कर्तव्यदक्ष कर्मचारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दिव्यांग बांधवास स्वखर्चाने कुबड्या विकत घेत मदत केली व त्यांचा प्रवास सुखकर केला.

सातारा शहरामध्ये पार्किंग समस्या गंभीर बनली असताना प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याची परिस्थीती पहायला मिळत आहेे.यामुळे वारंवार नागरिकांना बेशिस्त पार्किंग केल्यामुळे, तसेच वाहतुकीचे नियमांचे पालन न केल्याने वाहनांवर कारवाई केल्याने वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांसोबत तसेच अधिकार्‍यांसोबत वाद विवादाचे प्रसंग घडतात. याआधी महिला कर्मचार्‍यांना शिवीगाळ दमदाटी तर काहींच्या वर्दीवर हात उचलण्याचे प्रकार देखील वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी सोसले आहेत. दरम्यान सातारा शहरामध्ये प्रवाशांच्या हरवलेल्या वस्तू, सोन्याचे दागिने जसेच्या तसे मिळवून देण्याची कर्तव्यदक्षता देखील वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांनी दाखवून नागरिकांप्रती असणारे सेवा व्रत जपले आहे. पोवई नाक्यावर दिव्यांगास कुबड्यांची मदत करून त्यास माणुसकीचा आधार देण्यासारख्या घटनांमुळे वाहतुक शाखेची प्रतिमा उंचावण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या टिमकडून घडत आहे.

error: Content is protected !!