सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीनंतर महसूल प्रशासनातील तहसीलदार पदांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. सातारा महसूल विभागातील बदल्यांचा ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. यामध्ये काही दिवसापूर्वी कास पठारावरील अतिक्रमणांना नोटिसा बजावून ते अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसाची मुदत देणाऱ्या साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. ही बदली जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये तहसीलदार पदावर करण्यात आली आहे. साताऱ्याची तहसीलदार म्हणून जिल्हा पुरवठा विभागाचे सहाय्य पुरवठा अधिकारी राजेश सदाशिव जाधव यांच्याकडे तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला आहे.
२२ फेब्रुवारी २०१९ मध्ये तत्कालीन तहसीलदार निल प्रसाद चव्हाण यांची बदली झाल्यानंतर आशा होळकर यांनी सातारा तहसीलदार पदाचा चार्ज स्वीकारला होता. झिरो पेंडन्सी आणि पारदर्शक कारभार म्हणून आशा होळकर यांनी आपला चांगलाच धाक निर्माण केला होता. विशेषतः सातारा तालुक्यातील वाळू चोरीच्या प्रकरणांमध्ये त्यांनी कणखर भूमिका घेतली होती. अनेक बेकादेशीर उत्खननांना त्यांनी चांगलाच चाप लावला काेरोनाच्या काळामध्ये सुद्धा सातारा शहरातील आणीबाणीची परिस्थिती त्यांनी उत्कृष्टरित्या हाताळली आठवड्यापूर्वीच कास पठारावरील १२४ बांधकामांना त्यांनी आपले बांधकाम का पाडण्यात येऊ नये, अशा आशयाच्या नोटिसा पाठवून एकच खळबळ उडवली होती. या पार्श्वभूमीवर त्यांची कोल्हापूरला बदली झाल्याने पुन्हा उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात या रुटीन बदल्या असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले .
You must be logged in to post a comment.