सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अंदोरी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षाचा मुलगा अशिष व अडीच वर्षाची मुलगी ऐश्वर्या कालपासून बेपत्ता झालेल्या या लहानग्या सख्या बहीण भावांचे मृतदेह आज (ता. २९) सकाळी नीरा उजव्या कालव्यात पाडेगाव व पिंपरे बुद्रूक गावच्या हद्दीत आढळून आले. लोणंद पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करून लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
लोणंद पोलीस कालपासून या मुलांचा शोध घेत होते. महाबळेश्वरयेथील महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत शोध घेवूनही काहीच हाती लागले नव्हते. मात्र आज ( ता. २९) रोजी सकाळी शोध घेत लोणंद पोलिसांना पाडेगाव हद्दीतील तुकाईनगर परिसरात निरा उजव्या कालव्यात पाण्यात आशिष प्रशांत राणे या चार वर्षाच्या लहानग्याचा तर दुपारी ऐश्वर्या या आडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह पिंपरे बुद्रूक गावच्या हद्दीत चव्हाण वस्ती आढळून आला. हे दोघेही घरात आजी समवेत घरी होते तर त्यांचे आई वडिल शेतात कामासाठी गेले होते.
मात्र, नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी बाहेर गेलेली हे दोघेही बहिण भाऊ शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासुन बेपत्ता झाली होते. लोणंद पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्यावर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून लोणंद पोलिसांनी या मुलांचा शोध घेण्यात त्वरीत सुरुवात केली. रात्री उशीरापर्यंत शोध घेवूनही काही हाती लागले नव्हते. मात्र आज सकाळी या दोन्ही मुलांचे मृतदेह नीरा उजव्या कालव्यात आढळून आले. या घटनेबाबत अंदोरी व रुई गावावर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून दुःख व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरिक्षक गणेश माने हे अधिक तपास करत आहेत.
You must be logged in to post a comment.