मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत दोघे ठार; दोन महिला जखमी

खंडाळा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खंडाळा तालुक्यातील अहिरे गावच्या हद्दीत असणाऱ्या क्युबेल्ट कंपनीसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोघे ठार, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी साडेसात वाजता घडली. जखमींना उपचारार्थ सातारा येथे हलविण्यात आले आहे.

अपघाताबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिकेत भरत हेळकर (वय २७) हा मद्यपान करून लोणंदहून खंडाळ्याच्या दिशेने निघाला होता. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील अहिरे गावच्या हद्दीत क्युबेल्ट कंपनीसमोर कारचालक अनिकेत हेळकर (रा. श्रीरामनगर, सोनगीरवाडी, ता. वाई, जि. सातारा) याने मद्यपान करून परिणामांची जाणीव असताना ताब्यातील कार (एमएच ०२, बीआर ४२४६) ही हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात चालवून दोन दुचाकींना धडक दिली.

त्यामध्ये दुचाकी (एमएच ११ डीएफ ३७१७) हिलादेखील धडक दिल्याने अश्विनी तानाजी धायगुडे (वय ३३) व त्यांच्यासोबत असलेल्या भाग्यश्री सतीश धायगुडे (३०, दोघे रा.अहिरे) यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!