सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नरवणे, ता. माण येथे बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, माणच्या तहसीलदारांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव २२ फेब्रुवारी रोजी केला होता. पाच ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी ३३ हजार रुपये भरले होते. व लिलाव घेतला होता. दरम्यान, विलास धोंडिबा जाधव यांनी तलाठ्याकडे तक्रार केली की, चंद्रकांत नाथाजी जाधव हे बेकायदा वाळू उपसा करत आहेत. चंद्रकांत जाधव यांनी वाळू लिलाव घेतल्याचे सांगितले. त्यातूनच वाद वाढत गेला व बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात व त्यांचे चुलत भाऊ विलास धोंडिबा जाधव यांच्या गटांमध्ये मारामारी झाली. चाकू व कुऱ्हाडीने मारहाण झाल्याने यात अनेकजण जखमी झाले. जबर जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव व विलास धोंडिबा जाधव यांना दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या मारामारीमध्ये अन्य जखमी झालेले सातारा येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे समजते. दोन्ही कुटुंबांतील फिर्यादीचे जबाब घेण्याचे काम व गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.
You must be logged in to post a comment.