सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : धारदार शस्त्राने वार करून महिलेसह तिच्या दोन वर्षीय भाच्याचा खून करण्यात आला. कऱ्हाडनजीक वारुंजी फाट्यावर असलेल्या एका खोलीत दोघांचे मृतदेह मंगळवारी सडलेल्या स्थितीत आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
अनैतिक संबंधातून हे कृत्य झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. तर आरोपी प्रियकर पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.सुशिला सुनील शिंदे (वय ३५, रा. विमानतळ, ता. कऱ्हाड) व विराज निवास गायकवाड (वय २ वर्षे) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. तर आरोपी अरविंद सुरवसे हा पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ येथे सुशिला शिंदे ही महिला तिच्या आईसमवेत वास्तव्यास होती. तेथेच सुशिलाच्या बहिणीचा दोन वर्षाचा मुलगा विराज हाही राहण्यास आला होता. शनिवारी सुशिला ही भाचा विराजला घेऊन घरात कोणाला काहीही न सांगता बाहेर पडली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी याबाबत विराजच्या अपहरणाची तक्रार नोंदवून घेऊन सुशिला व अरविंद सुरवसे या दोघांवर गुन्हा दाखल केला.
याप्रकरणाचा पोलीस तपास करीत असतानाच सोमवारी वारूंजी फाटा येथे अरविंद राहत असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास आले. मात्र, गटर तुंबले असावे, असा समज झाल्यामुळे नागरीकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, मंगळवारी दुर्गंधी जास्तच येऊ लागल्याने तसेच खोलीत माशा घोंगावत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे संशय येऊन नागरीकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खोलीचा दरवाजा उघडला असता खोलीत सुशिला व विराजचा मृतदेह आढळून आला. सुशिलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार दिसून येत होता. अनैतिक संबंधातून अरविंद सुरवसे याने सुशिला व विराजचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगीतले.
You must be logged in to post a comment.