एक लाखाची लाच घेताना दोन पोलीस अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): परमिट रूमच्या माध्यमातून अवैधरित्या दारूची केलेल्या वाहतुकीतील गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना औंध, ता. खटाव येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, औंध येथील एका व्यक्तीचे परमिट रूम असून त्यामधून संबंधित व्यक्तीने अवैधरित्या दारूची वाहतूक केल्यामुळे त्याच्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात संबंधित व्यक्तीला दाखल असणाऱ्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व येथून पुढे व्यावसायात पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव या दोघांनी संबंधित व्यक्तीकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले.

संबंधित व्यक्तीने याबाबतची तक्रार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पथकाने तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर आज शुक्रवारी औंध येथील जुना बाजार पटांगणावर सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून रोख १ लाख रुपये स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव या दोघांना पथकाने रंगेहात पकडले. याबाबत दोघांवर औंध पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्वल अरुण वैद्य, पोलीस नाईक निलेश चव्हाण, पोलीस शिपाई तुषार भोसले, निलेश येवले यांनी या कारवाईत भाग घेतला.

दरम्यान,कोणीही शासकीय अधिकारी, कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ मोबाइल क्र. 9823231244, कार्यालय क्र.02162-238139 वर संपर्क साधावा, असे आवाहन उज्वल अरुण वैद्य यांनी केले आहे.

error: Content is protected !!