सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ”सातारा जिल्ह्यातील रेल्वे विभागातील विविध नवीन कामांच्या पाठपुराव्यासाठी तसेच सध्या होत असलेल्या काही त्रुटींसंदर्भात आज खासदार उदयनराजे भोसले यांनी डीआरएम ऑफिस येथे सर्व रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठकीमध्ये सविस्तर चर्चा केली व मार्ग काढण्याच्या सूचना केल्या.
सध्या सुरु असलेले सातारा ते मिरज डबलट्रॅकची सद्यस्थिती काय आहे निरा, वाठार, रहिमतपूर, पळशी, ताकारी याठिकाणी ओव्हरब्रिजचे सुरु असलेल्या कामे कधी पूर्ण होणार, या कामांची मुदत किती आहे, सातारा येथे माळगाड्यांसाठी वेअर हाऊस उभारणेच्या कामाचे आणि पुणे-सातारा विद्युत इंजिन वाहतुकीची आत्ताची परिस्थिती काय आहे, अश्या प्रश्नांची विचारणा करत, पुणे-सातारा-कराड रेल्वेची शटल सेवा सुरु करावी अशी आग्रही मागणी आज केली.
भारतीय रेल्वे सर्वसामान्य प्रवाश्यांचे आणि माल वाहतुकीचे मुख्य साधन आहे, हे सार्थ ठरवण्यासाठी सुरु असलेले रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. नवीन प्रकल्प सुधारणांचे प्रस्ताव द्या, आमचे नेहमीच त्यासाठी सहकार्य व पाठपुरावा राहील अशी आश्वासक भुमिका यावेळी व्यक्त केली.
पुणे रेल्वे विभागाच्या डिआरएम रेणु शर्मा यांचेसमवेत आज भारतीय रेल्वेच्या विभागीय मुख्यालयाच्या कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीत भारतीय रेल्वे प्रशासनाशी निगडीत, पुणे विभागातील सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. उदयनराजे यांनी प्रस्तावित केलेले सातारा येथील सुशोभिकरण तसेच वाठार रेल्वे स्टेशनचे पूरातन स्थापत्य वास्तुकला दर्शवणारे सुशोभिकरण ही कामे लवकर पूर्ण झाली पाहीजेत.
सातारा-मिरज रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरण आणि कराड-चिपळुण नवीन रेलट्रॅक ही कामे आव्हानात्मक आहे. रेल्वेच्या दळणवळणाची गती चौपट पाचपट होण्याबरोबरच सर्वांच्या अमुल्य वेळेची बचत होणार आहे. रेल्वे क्रॉसिंगसाठी रस्ते वाहतुक थांबवणे ही कृती अजुनही ब्रिटीश काळात असल्याची जाणिव वाटणारी आहे, त्यामुळे नागरीकांच्या हितासाठी लोणंद, पळशी, निरा, सातारा, रहिमतपूर, ताकारी येथील मुख्य रेल्वे क्रॉसिंगच्या ओव्हरब्रिजचे कामाला गती देवून ती कामे वेळेत पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे.
सातारा आणि कराड वरुन दररोज पुणे येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या निश्चितच मोठी आहे. या मार्गावर नोकरीच्या वेळेत शटल सेवा सुरु केल्यास, रेल्वेला नवीन उत्पन्न मिळण्याबरोबरच रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना प्रवासाचा शिण वाटणार नाही. यासाठी तातडीने पावले उचलावीत.
सालपे ते वाठार- 100 कि.मी. प्रतितास आणि जेजुरी ते वाठार 130 कि.मी.प्रतितास वेग ठेवण्याबाबतचे नियोजन अंमलात आणावे, ट्रेन नंबर 12630 कर्नाटका संपर्क क्रांती व्हाया पुणे-सातारा जाणाऱ्या गाडीला सातारा येथे 2 मिनीटांचा थांबा हा मिल्ट्री लोकांसाठी आवश्यक आहे. कोरोनाने इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय वाढली आहे. येथुन पुढे इंटरनेटवरच सर्व काही होणार आहे. त्यासाठी लहान स्थानकावर ऑनलाईन तिकिट सेवा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था झाली पाहीजे.
रेल्वेची मालवाहतुक तुलनात्मकदृष्टया सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन आहे. सातारा हे जिल्हा मुख्यालय आहे. याठिकाणावरुनच संपूर्ण जिल्हयात विविध वस्तुंचा पुरवठा होत असतो. त्यामुळे सातारा येथे माल धक्का उभारल्यास, त्याचा लाभ व्यापाऱ्यांबरोबरच शासनाला होणार आहे. मालधक्का उभारण्याच्या कामात कोणती समस्या असण्याचे कारण नसावे.
रेल्वेमार्ग दुहेरीकरण,ओवहरब्रिज, सुशोभिकरणासारखी महत्वाची कामे ही दिर्घकाळ वापरात येणारी आहेत त्यामुळे ती निश्चितच दर्जेदार आणि चिरकाल टिकणारी मजबुत झाली पाहीजे अश्या महत्वाच्या सूचना बैठकीत यावेळी दिल्या. रेल्वे प्रशासनाने, योग्य खबरदारी घेवून, कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून टाकून नवीन कामे प्रस्तावित केली पाहीजेत अशी अपेक्षा आहे.
You must be logged in to post a comment.