सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात भेट झाली. यावेळी दोघांमध्ये अर्धातास कमराबंद चर्चा झाली.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधीपासून सुरू आहे. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केला. पण उदयनराजें व रामराजेंचा थेट राजघराण्याच्या स्वभावामुळे यात यश आले नाही. दोघांमध्ये २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत व कायम वादविवाद होत राहिले.
दोघांनी एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देत एकमेकांची उणी -दुनी काढत राजशिष्टाचार गुंडाळून ठेवले होते. त्यानंतर हा वाद मागील सातआठ वर्ष पहायला मिळाला. मात्र, उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वाद पुन्हा बाजूला पडला.
मागील काही दिवसांपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यापार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. उदयनराजेंनी महिन्यापूर्वी बिनविरोधचा सूर ओढला होता. त्यानंतर आज सातारच्या शासकिय विश्रामगृहात गेल्यावर्षी जूनमध्ये घडला तसाच प्रकार घडला. रामराजे नाईक निंबाळकर शासकिय विश्रामगृहात थांबले होते.
शासकिय विश्रामगृहात अचानक खासदार उदयनराजे भोसले आले व थेट रामराजे बसलेल्या एक नंबरच्या सुटमध्ये गेले. दोघांनीही एकमेकांचे स्वागत केले. त्यानंतर दोघांनीही एकमेकांकडे हसत पाहिले व उदयनराजे कोचवर बसले. सुमारे अर्धातास दोघांनी चर्चा केली.
You must be logged in to post a comment.