मी चालत फिरीन नाहीतर लोळत फिरीन, तुम्हाला त्याचं काय? : उदयनराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खासदार उदयनराजे भोसले यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर आज (गुरुवार) त्यांनी किल्ले प्रतापगडावर भवानी मातेचं दर्शन घेऊन पूजा केली. त्यांनतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मारलेल्या टोल्यावर पलटवार केला. खासदार उदयनराजेंनी दुचाकीवरून मारलेल्या फेरफटक्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार टीका करत उदयनराजेंवर निशाणा साधला होता.

शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार उदयनराजे म्हणाले, मला चारचाकी वरून फिरणं परवडत नाही. मी चालत फिरीन, रांगत फिरीन, लोळत फिरीन तुम्हाला याबद्दल दुःख वाटत असेल, तर तुम्हीपण तसं करा, असं त्यांनी म्हटलंय. उदयनराजेंनी किल्ले प्रतापगडावरुनच आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता हिम्मत असेल, तर समोरा-समोर या, असं आव्हान त्यांना दिलंय, त्यामुळं सातारा पालिकेची निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही राजे आता आक्रमक होताना दिसत आहेत.

शहरात विविध कामांच्‍या प्रारंभाची पोस्‍टरबाजी सुरू आहे. पोस्‍टरबाजीचा खर्च पालिकेतून केला असेल, तर त्‍या खर्चातून एखादे छोटेमोठे विकासकाम पूर्ण झाले असते. कोणतरी दुचाकीवरून फिरल्‍याचेही माझ्‍या वाचनात आले. पाच वर्षे पालिकेची सत्ता तुमच्‍या ताब्‍यात आहे. या पाच वर्षांत सातारकरांची कामे केली असती, तर दुचाकीवर फिरायची वेळ आली नसती, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंवर नाव न घेता केली होती. या टीकेला किल्ले प्रतापगडावरुन उदयनराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

error: Content is protected !!