उदयनराजेंकडून महेरबानांची कानउघडणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवक आता ‘अ‍ॅक्टीव्ह’ झाले आहेत. स्वत: उदयनराजे भोसले यांनी बैठकांचा धडाका सुरू केला असून, सातारा विकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक बुधवारी दुपारी जलमंदिर येथे पार पडली. यावेळी उदयनराजेंनी साविआच्या पदाधिकारी अन् नगरसेवकांची कानउघडणी केली.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पक्षप्रतोद निशांत पाटील, सभागृह नेत्या स्मिता घोडके, सांस्कृतिक व क्रीडा विभाग प्रमुख सुजाता राजेमहाडिक, आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर मुख्याधिकारी अभिजीत बापट व आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते .

सातारा विकास आघाडीच्या पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या राजकारणाबाबत खा. उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, साविआमध्ये दोन तीन गट पडल्याचे जाणवत आहे. येत्या पालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडी एकसंघ दिसायला हवी. साविआने पाच वषार्पूर्वी जो वचननामा दिला होता त्यातील नव्वद टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हीच कामे घेऊन आपण लोकांमध्ये जायचे आहे. त्यासाठी गटतट बाजूला ठेऊन एकदिलाने काम करावे.

यावेळी शहर हद्दवाढीत आलेल्या भागाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. असे असले तरी शहरातील भुयारी गटार योजना, महिला स्वच्छता गृह, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण असे अनेक प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे आहे. कास धरणाचे काम जवळपास ९० टक्के झाले असले तरी ते पूर्णत्वास येण्यासाठी आणखी किती कालावधी जाणार हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सातारा विकास आघाडीपुढे आहे.

error: Content is protected !!