सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोना विषाणूनं दुसऱ्या लाटेच्या रुपाने राज्यात थैमान घातलं असून, दररोज लाखो लोक कोरोना बाधित होत असल्याने परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून वीकेंड लॉकडाउन लागू केला आहे. शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज साताऱ्यात रस्त्यावर उतरले. त्यांनी पोवई नाक्यावर भीक मांगो आंदोलन करत लाॅकडाऊनचा निषेध केला.
करोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. प्रचंड वेगानं होत असलेलं संक्रमण आणि वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ आणि दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.यास व्यापारी वर्गातून विरोध होत असून त्यांच्यावतीने मागील तीन दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले.
मिनी लाॅकडाऊन आणि वीकेंड लाॅकडाऊनचा विरोध करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आज सकाळी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर समोरील आंब्याच्या झाडाखाली बसून त्यांनी भीक मांगो आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ४५० रुपये जमल्यानंतर उदनयराजे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यांनी प्रशासनाला ती रक्कम देऊन लाॅकडाऊन हटवा अन्यथा लोकांचा उद्रेक होईल, असा इशारा दिला.
You must be logged in to post a comment.