उदयनराजेंची अजित पवारांवर सडकून टीका

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील क्रीडा संकुलावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले असून तेव्हाच्या पालकमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे. सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलनात मोठ्या स्पर्धा होऊ शकत नाहीत, बऱ्याच त्रुटी आहेत. उद्घाटन करणाऱ्यांना मुस्काडायला हवं, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला. उदयनराजे भोसले यांचा हा रोख तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. चुकीच्या पद्धतीने हे क्रीडा संकुल उभारल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केली.

त्यावेळी शाहू क्रीडा स्टेडिअमवर रणजी सामने खेळवले जात होते. आता ते सामने भरवता येत नाहीत. पुण्यातील बालेवाडी स्टेडिअम तयार करणाऱ्या बी.जी शिर्के यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतीने टेंडर भरले, पण त्यांना नाकारलं गेलं. हे मी यासाठी सांगतोय कारण प्रसारमाध्यमात आलं पाहिजे. हे आमदार, खासदार जी सो कॉल्ड माकडं आहेत ना, या सगळ्यांनी त्यातून बोध घ्यायला हवा, असा टोला यावेळी उदयनराजेंनी मारला. शहराचा विकास करताना राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला हवा. खेळ आणि इतर ठिकाणी राजकारण आणायला नाही, पाहिजे. इथं सगळं वाट्टोळं करुन टाकलेय. स्टेडियमचं टेंडर काढलं होतं, व्यापारी संकुलाचं नाही, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी याची उत्तरे द्यावी.

प्रत्येकवेळा मी नाही मी नाही म्हणणाऱ्याचं मुस्काड फोडलं पाहिजे. आवाज उठवला तेंव्हा मला विरोध केला होता. मी त्यांचे नाव माझ्या तोंडून घेणार नाही, नाव घेतले तर माझ्या तोंडून घाण वास मारेल. ही मंडळी जोड्यासमोर उभे करायचे लायकीचे नाहीत, असाही संताप यावेळी उदयनराजेंनी व्यक्त केला. स्टेडियमचं जर टेंडर काढलेले आहे तर बाहेरून गाळे कसे बनवले? असा सवालही यावेळी उदयनराजेंनी उपस्थित केला.

error: Content is protected !!