सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा):भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथील कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली.
उदयनराजे भोसले यांनी कौटुंबीक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राज यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज यांना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच ‘कृष्णकुंज’वर आल्याने राज यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी कोणतीही पक्षीय लेव्हलची किंवा राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, मराठा आरक्षणावर राज यांच्याशी चर्चा केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नात कोणीही राजकारण आणू नये असं त्यांना सांगितलं होतं. कोणाच्या आरक्षणावर गदा देखील येऊ नये. इतर समाजातील नेत्यांना जसा न्याय मिळाला तसा मराठा समाजातील लोकांना देखील भेटायला हवा. शिवाजी महाराजांचा विचार जपायला हवा नाहीतर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असं उदयनराजे म्हणाले. तसेच उद्या रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीचं आयोजन केले आहे, त्यानुषंगानेही चर्चा झाल्याचं ते म्हणाले.
You must be logged in to post a comment.