सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मोक्कातील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळणे ही अत्यंत धोकादायक बाब असून भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी, सरकारी वकील यांची याप्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान मोक्कातील आरोपींना कोणी उमेदवारी दिली कोणी निवडून आणले याचा जाब संबंधित लोकप्रतिनिधींना विचारावा, असा टोलाही त्यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता लगावला.
दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी सातारा येथे घडलेल्या एका घटनेचा दाखला देत खा. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, लोकशाहीतील कायदा-सुव्यवस्था, नियमावलीचे सर्वांनीच पालन करणे गरजेचे असताना सध्या गुन्हेगारी कृत्याच्या बातम्याच अधिक वाचायला मिळतात. सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले जाते. त्यांनी काही गुन्हेगारी कृत्य केले तर त्यांना सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केला जातो. फिर्यादीवर आरोपीसह पोलीस अधिकारी, सरकारी वकील, आमदार-खासदार, मंत्री दबाव आणत असतील तर पीडितांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न उपस्थित करत ते पुढे म्हणाले, ज्या सातारा जिल्ह्याने महाराष्ट्र आणि देशाला नेतृत्व दिले, त्या जिल्ह्यात आज पोलिस अधिकारी आणि सरकारी वकील संगनमत करून ३०७, ३१६, ४२७, ५०६ अशी गंभीर कलमे असणाऱ्या आरोपींना जामीन मिळतो. हा जामीन देताना न्यायालयाची दिशाभूल केली जाते, ही अत्यंत दुर्दैवी आणि धोकादायक घटना आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संबंधित खात्याचे मंत्री किंबहुना सर्वच मंत्र्यांना, न्यायमूर्तींना साकडे घालतो. महाराष्ट्रभर ज्यांच्यावर मोक्काचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांनी या गुन्ह्यात जामीन मंजूर करून घेतले आहेत. अशा घटनांमध्ये दुरुस्ती न केल्यास उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
सातारा येथील एका प्रकरणात ८० दिवस चार्जशीट दाखल केली गेली नाही.मोक्काच्या गुन्ह्यासह अन्य एक गुन्हा दाखल असणाऱ्या आरोपींना ८0 व्या दिवशी जामीन मंजूर होतो.जामीन मिळाल्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी चार्जशीट दाखल होते.याबाबत आश्चर्य व्यक्त करून उदयनराजे म्हणाले अशा घटनांची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.