उदयनराजे निवडणुकीत विरोधकांची पिपाणी करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन्ही राजेंचा शब्द शिरसावंद्य; साताऱ्यात आयटी हब, एमआयडीसी करणार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कोल्हापुरात शाहू महाराजांना बिनविरोध करण्याची भाषा वापरणाऱ्या नेत्याने साताऱ्यात दुटप्पीपणा दाखवला आहे. या नेत्याने शौचालयात पैसे खाणाऱ्या उमेदवाराला उदयनराजेंच्या विरोधात सातारा लोकसभेची उमेदवारी दिली आहे, या नेत्याची पिपाणी केल्याशिवाय खासदार उदयनराजे थांबणार नाहीत, असा असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ येथील तालीम संघावर आयोजित केलेल्या विराट सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, खासदार अमर साबळे, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार मदन भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, प्रदेश सदस्य सुवर्णाताई पाटील, माजी नगराध्यक्ष माधवी कदम यशराज पाटील, ॲड.बाळासाहेब बाबर, अविनाश कदम, अशोक मोरे, बाळासाहेब गोसावी, रामकृष्ण वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, साताऱ्याची ही विराट संकल्प सभा पाहून चार जूनच्या निकाला दिवशी गुलाल उधळायला साताऱ्यात यावच लागेल, हे आता स्पष्ट दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल अत्यंत गतीने सुरू आहे. देश त्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे, याची जाणीव संपूर्ण देशातील जनतेला झालेली आहे. सत्ता होती, तेव्हा जनतेला वाऱ्यावर सोडलेल्या नेत्याने मोदींना ऊसातलं काय कळतं अशी टिंगल केली होती. त्याच मोदींनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या साखर कारखान्यावर असलेला इन्कम टॅक्स रद्द करून शेतकऱ्यांची सुटका केली. मोदींना समजलं ते तुम्हाला समजलं नाही. जनतेच्या मनातील स्पंदन, रुदन हे मोदींना थेट समजते,असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या विरोधात महायुतीने उमेदवार द्यायला नको होता असे ते म्हणतात मात्र साताऱ्याच्या बाबतीत ते उलट भूमिका घेतात यातून त्यांचा दुटप्पीपणा समोर आला आहे. उमेदवार दिला तोही घोटाळेबाज आहे. त्यामुळे साताऱ्याची जनताच उदयनराजेंना रेकॉर्ड ब्रेक मते देऊन छत्रपतींच्या भूमीचा हुंकार हा देशाचा हुंकार आहे, हे दाखवून देईल.

उदयनराजे म्हणाले, देशाला तांत्रिक दृष्ट्या मागास ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे. महायुतीच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात तब्बल दहा हजार कोटींची कामे झाली. आता टुरिझम, आयटी पार्क ,कृष्णा नदीचे शुद्धीकरण, एमआयडीसीची निर्मिती, स्ट्रॉबेरी, हळद ,बटाटा संशोधन केंद्र,अग्रो प्रोसेसिंग युनिट्स उभारण्याच्या अनुषंगाने आम्ही पाऊले टाकत आहोत. आम्हाला केंद्र व राज्य सरकारचे निश्चितपणाने बळ मिळणार आहे. ५५ वर्षांमध्ये जे काँग्रेसला जमले नाही ते आम्ही दहा वर्षात करून दाखवले आणि इथून पुढच्या काळात देखील प्रगतीची ही गंगा अशीच वाहत राहणार आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते प्रचारामध्ये मतदारांच्या पायात साप सोडण्याचे काम करत आहेत. कुणी कितीही सांगितले तरी आम्ही खासदार उदयनराजे भोसले यांच्या सोबत काम करत आहोत. महायुतीचे चारही आमदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजय करू.

देवेंद्रजी वुई लव यू

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये साताऱ्यात आयटी पार्क उभारू असे म्हणताच श्रोत्यांमधील एक जण उठून देवेंद्रजी वुई लव यू.. असे मोठ्याने म्हणाला. देवेंद्र फडणवीस यांनी आय अल्सो लव यू.. असं म्हणत त्याला दाद दिली.

दोन महाराजांचा आदेश शिरसावंद्य

महाराजांचा आदेश न पाळण्याची बिशाद कोणाकडे आहे. त्यांनी आयटी हब, एमआयडीसी मागितली आहे, देशाचं आणि राज्याचे नेतृत्व खंबीर आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी निश्चितपणाने दिल्या जातील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

error: Content is protected !!