वाढदिवस साजरा न करण्याचा उदयनराजेंचा निर्णय

अजितदादांच्या रूपाने उमदा मित्र गमावल्याचे दुःख

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे लोकनेते, उपमुख्यमंत्री स्व. ना. अजितदादा अनंतराव पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील आकस्मिक निधनाने उभा महाराष्ट्र अद्यापही सावरलेला नाही. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी येत्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजी येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

स्व. अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक हरहुन्नरी, सडेतोड आणि कामाचा नेता गमावला आहे. ही मन पिळवटून टाकणारी घटना असून आजही ‘अजितदादा आपल्यात नाहीत’ ही कल्पनाच स्वीकारणं कठीण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. उदयनराजे भोसले आणि स्व. अजितदादा पवार यांचे ऋणानुबंध महाविद्यालयीन जीवनापासूनचे होते. ओळखीचे मैत्रीत कधी रूपांतर झाले हे कळलेच नाही, अशी भावनिक कबुली देत त्यांनी सांगितले की, वैचारिक मतभेद असले तरी मनभेद कधीच नव्हते. मार्ग वेगळे असतील, पण ध्येय एकच होते. सांगण्यासारख्या अनेक आठवणी आहेत, मात्र त्या शब्दांत मांडणे कठीण आहे.

स्व. अजितदादांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्र सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर, तसेच दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मानसिकतेचा विचार करून, आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मित्राची अकाली एक्झीट ही आपल्या मनाला खोलवर चटका देणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सातारा जिल्हा, महाराष्ट्र तसेच देशभरातील आपल्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, कार्यकर्ते किंवा नागरिकांनी वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, सत्कार, आयोजन किंवा गाजावाजा करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोणी सामाजिक उपक्रम करणार असल्यास, त्यास वाढदिवसाचे निमित्त देऊ नये किंवा त्याची कोणतीही प्रसिद्धी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्व. अजितदादांच्या निधनामुळे होत असलेली आपली आंतरिक घालमेल आणि तगमग समजून घेऊन सर्व स्नेही, कार्यकर्ते व नागरिक या निर्णयाची नोंद घेतील आणि आपल्या भावना समजून घेतील, असा विश्वास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!