प्रचाराच्या रणधुमाळीत उदयनराजेंची आघाडी..!

सातारा लोकसभा मतदारसंघातील रणसंग्रामाचा ‘भूमिशिल्प’ने घेतला आढावा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा लोकसभा निवडणुकीसाठी खा.उदयनराजेंनी आपली उमेदवारी फिक्स करून महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर होताच महेश शिंदे, नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून शशिकांत शिंदेंवर तोफ डागली. मुंबई बाजार समितीतील घोटाळ्यामुळे जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात शशिकांत शिंदे यांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात उदयनराजे भोसले यांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील निरुत्साही वातावरण त्यांच्या उमेदवाराच्या दृष्टीने मारक ठरत आहे, याविषयी ‘भूमिशिल्प’ने घेतलेला आढावा…

हाय व्होल्टेज सातारा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्र व देशाचे लक्ष लागून राहिले आहे. उदयनराजे भोसले यांनी मी येथून कमळाच्याच चिन्हावर लढणार व जिंकणार, अशी गर्जना केली. अपेक्षेप्रमाणे अजित पवारांना डावलून उदयनराजेंच्या उमेदवारीवर भाजपने शिक्कामोर्तब केले. यादरम्यान उदयनराजेंकडून काही चुका घडल्या. त्यात दिल्लीत जाऊन थांबणे, तिकीट न घेता परत येणे व नंतर सेलिब्रेशन करणे याचा समावेश होतो. उदयनराजे प्रेमींना ते आवडले असेल पण सामान्य जनतेला ते रुचले नाही. भाजप पक्ष श्रेष्ठींविषयी त्यांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया होत्या. त्याची काही कारणे सांगायची तर मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या वंशजाने दिल्ली दरबारी जाणे, तिकीट लांबवणे व अजित पवारांनी नाशिकसाठी खोडा घालणे या घटना सांगता येतील. उदयनराजेंनी तिकीटधारी न होता तिकीटदाता होऊन पक्षात मजबूत स्थान करावे, ही अपेक्षा होती. त्यामुळे सामान्यांचा कल महाविकास आघाडीकडे होता.

उदयनराजेंपेक्षा भाजप, मोदींविषयी नाराजी होती. महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा महाराष्ट्राला अंधारात ठेवणे, अजित पवारांमुळे समोर आलेले ओंगळवाणे राजकारण या गोष्टींमुळे शरद पवारांच्या मतांचा टक्का अधिक वाढत होता.भाजप विरोधात ३८ पक्ष, संघटना साताऱ्यात महाविकास आघाडीच्या बाजूने उभ्या राहिल्या. एकीकडे उदयनराजेंची तिकिटासाठी प्रतीक्षा तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी भवन, काँग्रेस भवन अशा बैठका होत होत्या. उपस्थितीही लक्षणीय होती. वातावरणही भाजप विरोधात तयार झाले. मत गादीला असूनही अनेकांची कुचंबणा होऊन भाजप नको म्हणून उदयनराजे नको असा सुर उमटू लागला. हे सुरुवातीचे वातावरण होते.

गेल्या चार दिवसात, म्हणजे अर्जाची छाननी व उमेदवारी अर्ज माघारी घेण्यापासून हळूहळू वातावरण बदलत चालल्याचे मतदारांशी बोलण्यावरून जाणवते. कारण ठरले मुंबई बाजार समितीत उघडकीस आलेला महाघोटाळा. केंद्र सरकार, मोदींची धोरणे, बेरोजगारी, महागाई, शेतकरी विरोधी धोरणे महाविकास आघाडीच्या प्रचारात आहेतच, परंतु स्थानिक पातळीवर कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जो मुंबई बाजार समितीतील ४००० कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे शशिकांत शिंदे यांची गोची झाली. त्यातच मतदारांना शशिकांत शिंदे यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. यावरून संशयाचे धुके त्यांच्या भोवती अधिकच गडद होऊ लागले.

हा घोटाळा खरे तर निवडणुकीपूर्वीच उघडकीस यायला हवा होता म्हणण्यापेक्षा ज्या त्यावेळी तो मांडायला हवा होता. महेश शिंदे निवडणुकीची आणि शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची वाट बघत होते का? त्यांना मुहूर्त साधायचा होता का? असा प्रश्न उभा राहतो. घोटाळा गंभीर आहे, हे मान्य. मग तेव्हाच नरेंद्र पाटील, महेश शिंदेंनी तो लोकांसमोर का मांडला नाही? उदयनराजेंचे आदेश होते का? की जर शशिकांत शिंदे रिंगणात असतील तरच तो काढायचा? असे प्रश्न लोकांना पडले. भाजपची रणनीती वेगळीच असते. परंतु उदयनराजे येथे रणनीती आखण्यास कमी पडले, असेही बोलले जाऊ लागले. परंतु घोटाळ्याचे संकेत उदयनराजे यांनी काही दिवस आधीच दिले होते. आपल्या विरोधात कोण उमेदवार उभा राहील, याचा अंदाज त्यांना उशिरा आला. त्यांनी कोणाला गृहीत धरले होते माहित नाही. इकडे जर तिकिटाची शाश्वती होती तर तिकडे शशिकांत शिंदे विरोधात फिल्डिंग लावायची होती. तिला उशीर झाला, असे म्हणता येईल.

उमेदवारी मागे घेईन हे वाक्य फक्त निवडणुकीपुरतेच म्हणण्यासाठी आहे. सत्ता ताब्यात असताना अंदाजाने ईडी, सीबीआय मागे लावता आली असती. त्यामुळे शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची हवाच निघाली असती. मुंबई बाजार समितीतील या प्रकरणात नक्कीच पाणी मुरते आहे, शशिकांत शिंदे म्हणतात, चार हजार कोटींचा घोटाळा झाला असता तर मी भाजपमध्ये जाऊन शुद्ध झालो असतो. याचा अर्थ असा आहे की हे असले दुखणे माहिती असते तर मी कधीच भाजपमध्ये गेलो असतो. किंवा अजित पवारांना साथ दिली असती! शशिकांत शिंदे यांची चलबिचल येथेच दिसून येते. अजूनही त्यांनी जनतेच्या मनातील संभ्रम दूर केलेला नाही. भविष्यात जर भाजपचे सरकार आले तर ईडी आपल्यावर कारवाई करू शकते. सुपुत्र तेजस आमदार होणार नाहीत, आपल्या राजकारणावर प्रश्नचिन्ह लागू शकते, याची जाणीव त्यांना असावी. अजूनही शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांनी कागदपत्रांसह केलेल्या आरोपांना समर्पक उत्तर दिलेली नाहीत . त्यामुळे संशयाचे मळभ अधिक गडद होत चालले आहेत. या निवडणुकीत त्याचे उत्तर मिळेल, असे वाटत नाही.

उदयनराजेंनी दोघांना म्हणजे महेश शिंदे व नरेंद्र पाटील यांना आपले मोहरे बनवून शशिकांत शिंदे यांच्यावर सोडले आहे, असेही म्हणता येत नाही. कारण कागदपत्रांवरील तारखा अगदी अलीकडच्या आहेत. विषय क्लिष्ट आहे, पण गंभीर आहे. पण त्याचा फायदा कसा घ्यायचा, प्रकरण निवडणुकीत कसे तापवत ठेवायचे हे महेश शिंदे, नरेंद्र पाटील आणि उदयनराजे यांनी ठरवले असावे. नरेंद्र पाटील म्हणतात, टप्प्याटप्प्याने कार्यक्रम करणार. पण कधी? मतदारांना माहित नाही. एकूणच मुंबई बाजार समिती घोटाळ्याने शशिकांत शिंदे यांचे दुखणे अवघड जागेचे केले आहे. त्यांनी प्रचारात कितीही गमजा मारल्या तरी मतदानाआधी डाग धुऊन काढणे अवघड आहे. या घोटाळ्यामुळे आधीचे जे महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण होते ते बदलू लागले आहे. त्यात भर पडली ती महाविकास आघाडी मधील प्रचाराच्या अनागोंदीची. कसलेही नियोजन नाही. ३८ पक्षांच्या नेतेमंडळींना बरोबर घेताना आधी जे ढोल बडवले त्याचा मागमुसच नाही. उमेदवार कुठे जातात? प्रचार करतात की नाही? जनतेला कळत नाही.

केंद्राच्या, राज्याच्या चुकीच्या धोरणांना सर्वसामान्य जनता कंटाळली आहे, ती कुठे जात नाही, हा आत्मविश्वास किंवा भ्रम शशिकांत शिंदेंनाच नव्हे तर शरद पवार यांना पण नडणार आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यामुळे साताऱ्यात महागाई, बेरोजगारी, एमआयडीसी हे मुद्दे गौण झाले आहेत. घोटाळ्यांचे नेमके प्रकरण काय आहे, हे जनतेला जाणून घ्यायची तीव्र उत्सुकता आहे. या कारणांमुळे आधी तुल्यबळ नंतर शरद पवारांमुळे झुकलेले शशिकांत शिंदे यांच्या बाजूचे वातावरण आता उदयनराजे भोसले यांच्या बाजूने झुकले असल्याचे लोकांशी चर्चा केल्यावर जाणवते. मुंबई बाजार समितीचा घोटाळा, कोरेगावातील जनतेचे म्हणणे संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात पोहोचवण्यात उदयनराजे यशस्वी झाले, मोट चांगली बांधली तर त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आव्हान सोपे असेल. सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी व पर्यायाने शशिकांत शिंदेचे आव्हान जे आधी तुल्यबळ वाटत होते, ते आता बॅक फुटवर जाऊन बचावात्मक पवित्र्यात खेळत आहेत तर उदयनराजे चौकार मारत आहेत. पुढे ते षटकार मारतील का? हे पुढच्या चार दिवसाच्या प्रचारात कळून येईल.

error: Content is protected !!