सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : एकीकडे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असताना, भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या भेटी घेतल्या होत्या. आज अचानकपणे उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून साताऱ्यात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. त्यानंतर शिवजयंतदिनी उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतल्याने साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आलाय. परंतु उदयनराजेंच्या एका नातेवाईकाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते स्वत: शिवेंद्रराजेंना भेटल्याची माहिती आहे.
उदयनराजे यांचे मामा नाशिकमध्ये असतात. त्यांच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी म्हणजेच उदयनराजेंच्या मामे भावाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी उदयनराजे हे शिवेंद्रराजे यांच्या सुरुची या निवासस्थानी गेले होते. या दरम्यान दोघांमध्ये कोणतीही चर्चा झाली नसून केवळ आमंत्रण देऊनच उदयनराजे तिथून निघाले असल्याची माहिती आहे.
You must be logged in to post a comment.