सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली येथे असलो तरी आमचे लक्ष पूर परिस्थितीवर आहे. पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. वित्तहानी कितीही झाली तरी आज ना उद्या ती भरून काढता येईल परंतु या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराची काळजी घ्या, असा धीर भाजपचे राज्यसभा खासदार छ.उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
खा.उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात मध्ये म्हटले आहे की, संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली येथे असलो तरी देखिल आमचे लक्ष पूरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर पूर्णपणे महाराष्ट्र आणि विशेष करुन कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे आहे. या भागातील पूरस्थितीची आणि भौगोलिक परिस्थितीची माहीती आम्ही केंद्रीय गृहमंत्रालय आणि मदत मंत्रालयाला दिली असून, केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. पूरबाधित जिल्ह्यातील बाधितांना आणि अतिवृष्टीबाधित कुटुंबियांना भक्कम आधार देण्यासाठी आवश्यक ते सर्व मदत कार्य पोहोचली पाहीजे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत.
महाराष्ट्रात विशेष करून कोकण,सातारा कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सारख्या सतत कोसळणा-या पावसामुळे विविध कारणाने अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत. पूर येणे, दरडी कोसळणे, पुराच्या पाण्यात सर्वकाही वाहुन जाणे, रस्त्यांवर पाणी साचुन वाहतुक विस्कळीत होणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत. वित्तहानीही प्रचंड प्रमाणात झाली आहे. काही ठिकाणी जीवितहानी देखिल झाली आहे. सरकारने मारले आणि आभाळ फाटले तर दाद कुठे मागायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.निसर्गाच्या आणि भोंगळ कारभाराचे असे अनेक फटके दुर्दैवाने गेल्या काही वर्षात काही अंतराने जरा जास्तच बसु लागले आहेत. त्यातच गेल्या सुमारे दिड वर्षापासून असलेल्या का नसलेल्या कोरोनाने जनता त्रासुन गेली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कटले आहे.
संपूर्ण यंत्रणा कोलमडून गेली आहे.परंतु कोणीही खचुन जावू नका, निसर्गाने संकटे दिली तरी त्यातुन मार्ग काढण्याची जिद्द आणि विवेक देखिल निसर्गच देत असतो. ‘सर सलामत तो पगड़ी पचास’ व या उक्तीप्रमाणे आपले आणि आपल्या कुटुंबाचे बहुमूल्य जीवन महत्वाचे आहे.म्हणून सावधानता बाळगुन संयम ठेवा. संसार पुन्हा उभा करता येईल, त्यासाठी आम्ही स्वतः तातडीने शक्य ते सर्वप्रकारचे मदतकार्य सुरु करीत आहोत. राज्य सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. विविध अशासकीय संस्था मदतकार्यासाठी पुढे आल्या आहेत. पूर येवून गेल्या ठिकाणी रोगराई पसरू नये म्हणून आम्ही स्वच्छता दूतांचा समावेश असलेली पथके तयार केली आहेत. आर्थिक, सहाय्याबरोबरच श्रम सहाय्य देखिल पुरविण्याचा आराखडा आम्ही हाती घेतला आहे असल्याचे खा. उदयनराजेंनी म्हटले आहे.
You must be logged in to post a comment.