उद्योजकांनो, भूमिपुत्रांना प्राधान्य द्या : शंभूराज देसाई

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर केला गेल्यामुळे जिल्ह्यातील उद्योग बंद करण्यात आले होते. त्यामुळे परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात गेले आहेत. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत पण आता कुशल कामगारांची कमतरता भासत असल्याने जिल्ह्यातील उद्योजकांनी भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गृह राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, सहायक आयुक्त (कौशल्य) विकास जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
जिल्ह्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करुन देसाई पुढे म्हणाले, ’एमआयडीसींमध्ये जे परप्रांतीय मोठ्या प्रमाणात कामावर होते ते आता आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या. एमआयडीसीतील उद्योजकांबरोबर लवकरच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घेऊन बैठक घेतली जाईल व जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येतील.’
ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगांना कुशल कामगार मिळतील. कामगार विभागाने व उद्योग विभागाने उद्योगांना किती कुशल कामगारांची गरज आहे याची नोंदणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत केल्या.
error: Content is protected !!