सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : उंडाळे गावातील माळी वस्तीत घरगुती कारणातून दाजीनं मेव्हुण्याचा धारधार शस्त्रानं खून केल्याची घटना घडलीय. काल शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला असून घटनास्थळावरून फरार झालेल्या संशयिताला कऱ्हाड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.
सचिन वसंत मंडले (वय 35, मूळ रा. रेठरे खुर्द, सध्या- उंडाळे, ता. कऱ्हाड) असं खून झालेल्याचं नाव असून अवधूत हणमंत मदने (वय- 42, रा. रेठरे हरणाक्ष) असे संशयिताचं नाव असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. या प्रकारामुळे उंडाळे परिसरात खळबळ उडाली.
रेठरे खुर्द येथील सचिन मंडले हे दूध व्यावसायानिमित्त उंडाळेत भाड्यानं घर घेवून तिथं राहतात. अवधूत मदने यांनी धारधार शस्त्रानं मेव्हुणा सचिन मंडले यांच्यावर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. सचिन यास उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलं.
दरम्यान, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीनं संशयित अवधूत मदने यांचा शोध घेवून त्याला करवडी (ता. कऱ्हाड) येथून ताब्यात घेतलं.
You must be logged in to post a comment.