वाई बसस्थानकात बसच्या चाकाखाली आल्याने विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाईच्या बसस्थानकावर आज दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास एस टी बसच्या चाकाखाली १३ वर्षीय विद्यार्थीनी चिरडल्याने जागीच ठार्‌‍‍ झाली. श्रावणी विकास आयवळे (रा. सुलतानपूर, ता. वाई) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती, त. ल. जोशी विद्यालयात सातवीमध्ये शिकत होती.

याबाबत अधिक माहिती अशी की,वाई बसस्थानकात दुपारी दीडच्या सुमारास वाई बालेघर गाडी (क्र. एम एच १४ बी टी ०४९६) ही बस बसस्थानकावर फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी श्रावणी आयवळे ही विद्यार्थीनी गाडीच्या मागच्या बाजूस पडली. यावेळी गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले.या घटनेनंतर खळबळ उडाली. अपघातानंतर बसस्थानक परिसरात मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णकांत पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी झालेली गर्दी पोलिसांनी हटवली. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले रा. नांदवळ (वय 36) याला ताब्यात घेतले आहे.

प्रत्येक बसस्थानकावर हाच धोका

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकावर हाच धोका दररोज समोर असतो. मात्र, घटना घडली की त्याचे गांभीर्य ठळक होते. यापूर्वी देखील अशा अनेक जिल्ह्यातील बसस्थानकावर घडलेल्या आहेत. शहरात शाळा शिकण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी घरी जाण्याची झालेली घाई. त्यातच बसस्थानकात लागत असलेली एस. टी. बस आणि मग पळापळा, रेटारेटीत अशी दुर्देवी घटना घडते तसाच प्रकार वाई बसस्थानकात घडला असून या घटनेमुळे विद्यार्थ्यांना देखील एस. टी. बसमध्ये गर्दीत चढताना शिस्त लावून घेताना काळजी घेण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली व उपाय योजना करणेही आवश्यक आहे.

शिक्षक व पालक वर्गात भीतीचे वातावरण

मूळची लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आशिव गावचे अहिवळे कुटुंब उदरनिर्वाहासाठी गेली 12 वर्षांपासून वाई एमआयडीसी मध्ये कामाला असून सुलतानपूर याठिकाणी वास्तव्यास आहे श्रावणीच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण सुलतानपूर गावासह वाई हायस्कूल व परिसरात विद्यार्थी वर्गात शोककळा पसरली सदर दुर्दैवी घटनेने तालुक्यामधील शिक्षक व पालक वर्गात भीतीचे वातावरण तयार झाले. शनिवारमुळे सकाळच्या सत्रात भरलेल्या सर्वच शाळा दुपारीच सुटल्यामुळे आपआपल्या गावाला जाण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वाई आगारात एस टी पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे प्रत्येक फलाटावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. फलाट क्रमांक ६ लगतच्या मोकळ्या जागेत वाई मांढरदेवी बालेघर येणारी एस टी पहाताच नेहमीच्या सवयी प्रमाणे विद्यार्थ्यांनी गाडी पकडण्यासाठी एकच पळापळ व गर्दी केली असता या धावपळीमध्ये कु. श्रावणी खाली पडून एसटीच्या चाकाखाली आली. वाई आगाराकडे गाड्यांची संख्या फार अपुरी उपलब्ध गाड्या दुरुस्त असतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या कधीच वेळेवर उपलब्ध होत नाहीत. अनेक ठिकाणी दिवसातून एक किंवा दोनच गाड्या पाठवल्या जात असल्याने विद्यार्थी, प्रवासी संख्या प्रचंड वाढत जाते. त्यामुळे फलाटावर गाडी येता क्षणीच गाडीत जागा मिळवण्यासाठी एकच झुंबड उडते. यामध्ये जेष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागतो. तर तरुणांच्या टोळक्यांचा हैदोस पहायला मिळतो. यावर कोणाचेच नियंत्रण नाही. यातूनही वाहक व चालक यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर अनेकदा भांडणाचा कटू प्रसंग वाट्याला येत असल्याने बिचारे चालक वाहकांना मुग गिळुन गप्प बसावे लागते याचा विचार होणे गरजेचे आहे.

श्रावणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळण्याची मागणी

श्रावणीच्या मृत्यूची दुर्दैवी घटना कळताच घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात सुलतानपूर गावच्या ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर झाले होते.वाई मांढरदेव रस्त्यावर असणाऱ्या गावाकडे जाण्यासाठी वाई बालेघर ही एकमेवच गाडी असल्याची खंत व्यक्त करत गाडीच्या फेऱ्या वाढवण्याची व श्रावणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली. वाई आगार प्रमुख व कर्मचाऱ्यांनीही श्रावणीच्या कुटुंबाला लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले.

error: Content is protected !!