पवनचक्की कामगारांच्या अन्यायकारक बदल्या रद्द

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सुझलॉन कंपनीने पवनचक्क्यांवर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना वेठीस धरून त्यांच्या बदल्या परराज्यात केल्या होत्या. तसेच कामगार बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यास त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या अन्यायापासून सुटका करून घेण्यासाठी कामगारांनी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे धाव घेतली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शिष्टाई करून कामगार आणि कंपनीमध्ये समन्वय घडवला. कंपनी प्रशासनाने कामगारांच्या बदल्या रद्द केल्या असून थकीत पगार देण्याबरोबरच भरघोस पगारवाढही मंजूर केली.

चाळकेवाडी, ठोसेघर आदी परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पावनचक्क्यांवर सातारा आणि पाटण तालुक्यातील स्थानिक कामगार नोकरी करत आहेत. सुमारे दोन महिन्यांपूर्वी ७० ते ८० स्थानिक कामगारांची सुझलॉन प्रशासनाने अचानक राजस्थान, छत्तीसगड आदी परराज्यात बदली केल्याचे जाहीर केले. तसेच बदलीच्या ठिकाणी हजर न झाल्यास कामावरून कमी करण्याचा वटहुकूम कंपनीने काढला. यामुळे स्थानिक कामगारांवर मोठा अन्याय झाला. यातून वाचण्यासाठी कामगारांनी तडक सुरुची कार्यालय गाठून आ. शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुझलॉन कंपनीने बदली रद्द करून या कामगारांना आहे त्याच ठिकाणी पुन्हा कामावर घ्यावे, त्यांची नियमानुसार पगारवाढ करावी अन्यथा एकही पवनचक्की सुरु होऊ देणारा नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा सज्जड इशारा कंपनी प्रशासनाला दिला होता. तसेच यासंदर्भातील निवेदनही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिले होते. 

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या इशाऱ्यानंतर सुझलॉन कंपनी व्यवस्थापनाला खडबडून जाग आली. कंपनीने तोडगा काढण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र, अन्यायकारक बदल्या रद्द करून त्वरित कामगारांना हजर करून घ्यावेच लागेल अशी कडक भूमिका आ. शिवेंद्रसिंहराजेंनी घेतल्याने कंपनी व्यवस्थापन नमले. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या शिष्टाईतून कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात समन्वय घडून आला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या इशाऱ्यानुसार कंपनी व्यवस्थापनाने सर्व स्थानिक कामगारांच्या अन्यायकारक बदल्या रद्द करून त्यांना पूर्वीच्या ठिकाणी कामावर हजर करून घेतले. याशिवाय थकीत पगार देऊन भरघोस पगारवाढही मंजूर केली.

error: Content is protected !!