सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी अद्ययावत करा : प्रांताधिकारी सुधाकर भोसले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २६२ सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रमाप्रमाणे १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकास वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक/युवती, तृतीय पंथी, नवविवाहिता यांच्या नावांचा समावेश, मयत अथवा स्थलांतरितांच्या नावांची वगळणी आणि अन्य आवश्यक दुरुस्त्यांसह अद्ययावत करणेची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली.

२६२ सातारा विधानसभा मतदार संघातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सातारा तालुक्यातील सर्व सरपंच, पोलिस पाटील, बीएलओ, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, सुपरवायझर, सातारा तालुक्यातील निवडणुक साक्षरता क्लबचे सर्व नोडल अधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य, यांना मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रमानुसार राबविलेल्या विविध योजनांची माहिती देवून मतदार यादी बाबत काही सूचना असतील तर त्या जाणून घेण्यासाठी गुरुवारी शाहू कला मंदिर सातारा आयोजित बैठकीत श्री.सुधाकर भोसले बोलत होते. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार विजयकुमार धायगुडे उपस्थित होते.

मतदार स्वतः तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत येऊन, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), व्होटर हेल्प लाईन द्वारे आणि राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) मार्फत चुकीची नावे दुरुस्त करणे, फोटो चुकीचे असतील अथवा खराब असतील तर ते बदलणे, मयत व दुबार व्यक्तींची नावे वगळणे, पत्ता बदलला असेल तर त्याची दुरुस्ती आणि नवीन नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया फॉर्म नंबर ६,७ व ८ समक्ष अथवा ऑन लाईन भरुन देवून पूर्ण करु शकत असल्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच दि. १ जानेवारी २०२४ रोजी ज्या व्यक्तीस १८ वर्ष पुर्ण झालेली आहेत त्यांची मतदार नोंदणी झाली किंवा कसे तसेच चालु तारखेवर सर्व मयत व कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी झालेची खात्री करण्याबाबत सर्व संबधीतांना सुचना प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी यावेळी दिल्या.

यावेळी बैठकीस उपस्थित राजकीय पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न व शंकांना समर्पक उत्तरे देवून प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी त्यांचे समाधान केले, व सर्व बीएलओ यांनी मोहिम काळात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या आवाहनास प्रतिसाद देवून चांगले काम केल्याबद्दल बीएलओंचे आभार मानले.

error: Content is protected !!