४५ वर्षावरील सर्वांनी लसीकरण करून कोरोनावर मात करावी :आ. शिवेंद्रराजे

सरताळे ता. जावली येथे आरोग्य उपकेंद्रावर लसीकरणाचा शुभारंभ करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवर.

सातारा , (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोनावर मात करण्यासाठी ४५ वर्षावरील सर्वांनीच कोरोनावरील लस घ्यावी, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.  

प्राथमिक आरोग्य केंद्र सायगाव अंतर्गत सरताळे आरोग्य उपकेंद्र येथे ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी कोवीड १९ वरील लस देण्याचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहिते, सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती मुंडेकर, आरोग्य सहायक बबनराव सरड, सी.एच.ओ. अन्नपूर्णा हिप्पर्गी, आरोग्य सेवक वैभव जगताप, शिवाजी कचरे, गट प्रवर्तक सारिका गुजर, ए एन एम ज्योती चव्हाण, शीतल जाधव, सरताळेच्या सरपंच सौ.सोनाली राजाराम पवार, उपसरपंच सुनील श्रीपती धुमाळ, सर्व सदस्य, ग्रामसेवक संजय बोराटे आदी उपस्थित होते. 
महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अजूनही या महामारीची साथ आटोक्यात आलेली नाही. सर्वत्र पुन्हा रुग्ण वाढ सुरु झाली आहे. कोरोनापासून स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या निकषास पात्र असणाऱ्या आणि ४५ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी आणि कोरोनाचे संकट थोपवण्यास हातभार लावावा. याशिवाय प्रत्येकाने मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. वारंवार साबणाने हात धुवावेत तसेच सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करावे. या सर्व बाबी प्रत्येकाला माहिती आहेत. त्यामुळे विनाकारण कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले. 

error: Content is protected !!