जादा लसीकरण केंद्राबाबत लवकरच निर्णय होऊन लसीकरणाचा प्रश्न सुटेल : उदयनराजे

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र शासनाने 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा धोरणात्मक ‍निर्णय घेतला आहे. लोकसंख्येचा विचार करता सातारा शहरात सदरबझार, दगडीशाळेमध्ये आणि शाहुपूरी ग्रामपंचायत इमारत या ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याबरोबरच जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत आणी मोठ्या ग्रामपंचायतीच्या अधिकारक्षेत्रात नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्याचे जिल्हा प्रशासनाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावीत केले आहे. त्यादृष्टीने केंदसरकार प्रयत्नशील असून लवकरच नागरीकांना सुकर होईल अशी लसीकरणाची व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातुन करण्यात येईल अशी माहीती खा. श्री. छ.उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

सध्या कोरोनाने जगभरासह, भारतामध्ये थैमान घातले आहे. आता केंद्राने 1 मे रोजीपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण करावयाची असलेली लोकसंख्या विचारात घेवून, लसीकरण केंद्र सुध्दा वाढवावी लागणार आहेत. संपूर्ण जिल्हयातील नगरपालिका, नगरपंचायती, मोठया ग्रामपंचायती इ. ठिकाणी नागरीक-ग्रामस्थ यांच्या सोयीसाठी नव्याने लसीकरण केंद्रं सुरु करणेबाबत,जिल्हाप्रशासन आणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावीत केले आहे.

सातारा शहरात सुरुवातीपासूनच नगरपालिकेच्या माध्यमातुन, कस्तुरबा आरोग्य केंद्र  आणि गोडोली येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज आरोग्य केंद्रामध्ये सातारा शहर आणी आसपासच्या उपनगरातील नागरीकांना दररोज सरासरी प्रत्येक केंद्रावर 300 व्यक्तींना लस दिली जात आहे. या केंद्रावर लसीकरण करुन घेण्यासाठी येणा-या नागरीकांची बैठक व्यवस्था,‍ पिण्याच्या पाण्याची सोय, तातडीच्या वैद्यकीय प्रथोमोपचाराची सोय आदी बाबींची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच सातारा शहरातील सदरबझार येथील दगडी शाळा, आणी शाहुपूरी येथे ग्रामपंचायत इमारत या नवीन जादा ‍ठिकाणांसह, संपूर्ण जिल्हयातील नगरपरिषदा, नगरपंचायती, मोठया ग्रामपंचायती येथे केंद्र सरकारच्या मंजूरीप्रमाणे नवीन लसीकरण केंद्र सुरु करुन, 18 वर्षावरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाची सुलभ व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

error: Content is protected !!