वाढीव उत्पादनासाठी काटेकोर पद्धतीच्या शेतीची गरज

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे प्रतिपादन; वाईतील सोयाबीन पेरणी प्लॉटला भेट

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बेभरवशाचे हवामान, अवकाळी पाऊस, दुष्काळ, मजुरांची टंचाई, वाढता उत्पादन खर्च अशा विविध समस्यांमधून शेतकरी सध्या जात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी काटेकोर व अचूक व्यवस्थापनाद्वारे उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन घेण्याकरिता प्रीसिजन फार्मिंग’ची म्हणजेच काटेकोर पध्दतीने शेती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील उडतारे या गावातील सुनील जगताप यांनी ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत पेरणी यंत्राद्वारे टोकन पद्धतीने सोयाबीन पेरणी केलेल्या प्लॉटला कदम यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी 20-25 क्विंटल असताना सुनील जगताप यांनी 2019 च्या खरिपात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत सरीवर टोकन पद्धतीने एकरी फक्त 15 किलो बियाणे वापरून सोयाबीनचे एकरी 20 क्विंटल उत्पादन घेतल्याचे सांगितले. जे आता हेक्टरी 50 क्विंटल झाले. 
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत यांनी जिल्ह्यात सोयाबीन पिकासाठी सरीवर टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली असून हेक्टरी 50 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेण्याचे लक्ष्यांक साध्य करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, अजित पिसाळ, कृषी अधिकारी प्रकाश राठोड मंडळ, कृषी पर्यवेक्षक माणिक बनसोडे, कृषी सहायक निखिल मोरे, तानाजी यमगर, आदी कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!