सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये वारसदार म्हणून तक्रारदार व त्यांच्या बहिणीचे नाव नोंद करून सात बारा देण्यासाठी तीन हजारांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी दोन हजार रूपये स्वीकारताना माण तालुक्यातील वरकुटे-म्हसवडचे तलाठी दादासाहेब अनिल नरळे (रा. पाणवण, ता. माण) यांना आज लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पडकले.
यासंदर्भातील माहिती अशी की, यातील तक्रारदाराने तलाठी दादासाहेब नरळे यांना वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये त्यांची व त्यांच्या बहिणीच्या नावाची नोंद करून, तसा सातबारा देण्याची मागणी केली होती. यासाठी तलाठी दादासाहेब नरळे याने तीन हजार रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती.
त्यानुसार लाच लुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक अशोक शिर्के, पोलिस नाईक विनोद राजे, संभाजी काटकर, तुषार भोसले, निलेश येवले यांनी वरकुटे-म्हसवड येथील तलाठी कार्यालयात (सजात) सापळा रचला. तलाठ्याने मागणी केल्यापैकी दोन हजार रूपये देण्यासाठी तक्रारदार कार्यालयात गेले. त्यावेळी दोन हजार रूपयांची लाच स्वीकारताना दादासाहेब नरळे यांना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
You must be logged in to post a comment.