वेण्णात एकाच कुटुंबातील चौघे वाहून गेले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. जावळी तालुक्यात रेंगडेवाडी येथे एकाच कुटुंबातील चौघे जण वेण्णा नदीच्या पुरात वाहून गेले आहेत. रात्री उशिरापर्यंत यापैकी कुणाचाही शोध लागू शकलेला नाही. सहदेव गणपत कासुर्डे (वय ६०), भागाबाई सहदेव कासुर्डे (५०), तानाबाई किसन कासुर्डे (५०), रविंद्र सहदेव कासुर्डे (३०) असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत.

राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातही पावसामुळे हाहाकार उडाला असून अनेक नद्यांना पूर आला आहे. जावळीतील रेंगडेवाडी येथे दोन महिला आणि दोन पुरुष ओढा पार करत असताना पुरात वाहून गेले आहेत. वेण्णा नदीपात्रात त्यांचा शोध घेण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही त्यांचा शोध लागू शकलेला नाही. शोधमोहीम रात्रीही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जावळी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख आणि तहसीलदार राजेंद्र पोळ तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!