सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माण तालुक्यात दोन भोंदूबाबांनी भूतबाधा झाल्याच्या दिलेल्या सल्ल्यावर विश्वास ठेवून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी येथील फलटण रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयाजवळ काही फिरस्त्या वस्ती आहे. या वस्तीवरील बायली सुभाष इंगवले या चौदा वर्षीय मुलीचे सतत डोके दुखत होते. तसेच तिला तापही आला होता. तिच्यावर वडूज येथील एका डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले होते. परंतु वैद्यकीय उपचारानंतरही मुलीच्या पालकांनी बायलीला गोंदवले येथील उत्तम अवघडे या भोंदूबाबाकडे नेले. त्याने तुमच्या घराच्या आसपास बारव आहे. तेथील भूत मुलीला लागले आहे. अमावास्येपर्यंत ठीक होइल, असे सांगून मंत्रतंत्र करून त्यांना परत घरी पाठवले. त्याच दिवशी सायंकाळी जास्त त्रास झाल्याने बायलीला मोही गावच्या रामचंद्र सावंत या भोंदूकडे नेण्यात आले. त्यानेही बारवीतील भूत लागले आहे. पौर्णिमेपर्यंत देव बांधले आहेत. ते ठीक होणे खूप कठीण आहे, असे सांगितले.
२० तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत बायलीला भयंकर धोका आहे, असे सांगून भोंदूबाबाने मंत्रतत्र व अंगारे धुपारे करून परत तिला घरी पाठवले. शनिवारी २० तारखेच्या रात्री घरातील सर्वजण बायलीला गराडा घालून काय होतेय ते केवळ बघत बसले. बायली शांत बसली होती. व तिचे हातपाय थरथर कापत होते. पण तरीही सगळ्यांच्या नजरा घडाळ्याच्या काट्याके होत्या. सर्वजण बारा वाजण्याची वाट पाहात होते. रात्री बाराला पाच मिनिटे कमी असातना बायली निपचित पडली. यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे देवऋषींनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच भूताने बायलीला नेले, असा समज करून कुटुंबीयांनी काहीही बोभाटा न करता बायलीचा मृतदेहाचे जवळ असलेल्या ओढ्याच्या शेजारी दफन केले.
ही घटना दहिवडीचे सैन्य दलातील जवान सुनील काटकर यांना अंनिसचे प्रशांत पोतदार यांना सांगितली. समाजात नाचक्की होइल तसेच देवऋषींच्या भीतीने या मुलीच्या कुटुंबीयांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला. व आमची काहीही तक्रार नाही, असेही सांगितले. परंतु पोतदार यांनी याचा पाठपुरावा सुरू ठेवला. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना भेटून त्यांनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर रात्रीचं सर्व सूत्रे हालली आणि काही वेळातच दोन्ही भोंदूबाबांना दहिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. रामचंद्र तुकाराम सावंत (वय ४५, रा. मोही, ता. माण), उत्तम कोंडीबा अवघडे (वय ५५, रा. गोंदवले, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबांची नावे आहेत.
You must be logged in to post a comment.