विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला भगदाड
सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला असून कारळे गावच्या सरपंचासह प्रमुख ग्रामस्थांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या सातारा येथील कोयना दौलत या निवासस्थानी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो ग्रामस्थांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घटना मोठे भगदाड पडले आहे.
पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर या दोन पारंपरिक विरोधकांमध्ये राजकीय धुमश्चक्री सुरू असते. दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी पक्षांपेक्षाही येथे या दोन नेत्यांच्या गटांमध्येच लढत होत असते. शंभूराज देसाई हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. साखर कारखान्याचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
शिवसेनेतील फुटी नंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्याचे फलित म्हणून त्यांना सातारा व ठाण्याचे पालकमंत्रीपद तसेच उत्पादन शुल्क सारखे महत्त्वाचे खाते देण्यात आले. तसेच शिवसेनेची मुख्यमंत्र्यानंतरचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची गणना होऊ लागली.
दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्या अगोदरपासूनच पाटण तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले होते. त्यानुसार आज पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला असून पाटण तालुक्यातील कारळे ग्रामस्थांनी सरपंचांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या ताकतीने गावातले मतदान पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बाजूने करण्यासाठी पुढील काळात कारळे ग्रामस्थ प्रयत्न करणार असल्याची माहितीदेखील सरपंच व प्रमुख ग्रामस्थांनी ‘भूमिशिल्प’शी बोलताना दिली आहे.
पाटण तालुक्यात विरोधकांच्या निष्क्रियतेला कंटाळलेले कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर धनुष्यबाण हाती धरत आहेत. आगामी निवडणुकीत काय होणार याची झलकच शिवसेनेकडे येत असलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रवाहामुळे दिसून येत आहे.
– ना.शंभूराज देसाई
You must be logged in to post a comment.