समारंभ नामकरणाचा; निर्धार मतदानाचा!

नामकरण समारंभात घेतली मतदानाची शपथ;कोडोलीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव प्रशासनातर्फे नेहमीच्या उपक्रमांबरोबरच मतदान जनजागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. त्या अंतर्गत कोडोली येथे चक्क एका नामकरण समारंभात चिमुकल्या बाळाच्या साक्षीने सुमारे ५०० अतिथिंनी मतदानाची उत्साहाने शपथ घेतली.

खरं तर नामकरण विधी हा तशा अर्थाने घरगुती आणि खाजगी स्वरूपाचा असतो.मात्र देशकार्य म्हणून सर्वांनी मतदानाची शपथ घेण्यास संमती दिली. बाळाचे वडील कोडोलीचे रहिवासी किशोर घोरपडे यांनी याबाबत मतदान जनजागृती पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांच्या विनंतीला मान दिला आणि सर्व पाहुणेमंडळींना एकत्र केले. कोरेगाव मतदार संघअंतर्गत खेड- कोडोली मधील अनेक शहरी भागात मतदानाचे प्रमाण कमी आहे. गतवेळी काही मतदान केंद्रांमध्ये तर ५० टक्के पेक्षा कमी मतदान झाले होते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मतदान जागृती गरजेची आहे.

श्री. क्षीरसागर यांनी यावेळी मतदानाची शपथ देण्याअगोदर मतदानाचे महत्त्व आणि प्रशासनाची भूमिका याविषयी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,”देशाची समृद्धी, विकास आणि संस्कृतीचे संवर्धन यासाठी सर्वांचाच लोकशाहीमध्ये सहभाग महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी मतदान ही खूप मोठी संधी आहे .अचूक भवितव्य साधण्याची मतदान ही एक संधी असते.निवडणूक म्हणजे करमणूक नाही. तर राज्यघटनेचा केलेला तो एक सन्मान आहे.नवमतदार असो की जुने मतदार सर्वांनीच या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवणे गरजेचे आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड कष्टाने लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मताधिकाराला प्रचंड महत्त्व दिले आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान गरजेचे आहे.

यावेळी डॉक्टर, इंजिनिअर ,प्राध्यापक व्यावसायिक असे अनेक स्तरातील पाहुणेमंडळी उपस्थित होते. या नवोपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले आणि प्रशासनाच्या आवाहनाला साथ देण्याची ग्वाही दिली.डॉ. राहुल गिराम-पाटील यांनी आभार मानले.

२०४४ सालचा चिमुकला मतदार…

या नामकरण सोहळ्यातील बाळाचे वय पाहता तब्बल १८ वर्षांनी तो मतदार होईल. त्यावेळी २०४४ या वर्षाची लोकसभा निवडणूक असेल! त्या अर्थाने हा चिमुकला मतदार १८ वर्षे अगोदरच या मतदान जनजागृतीचा साक्षीदार ठरला.त्याच्या जीवनाची सुरुवातच सर्वांच्या साक्षीने देशकार्याने झाल्यामुळे तसेच नामकरण विधीला सामाजिक उपक्रमाची विधायक जोड मिळाल्यामुळे बाळाचे आई-वडील विशेष आनंदात होते.

error: Content is protected !!