वाढेफाटा परिसरातील दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान

सातारा : सातारा शहराजवळील वाढे फाटा चौकात आग लागल्याने तीन दुकानांतील साहित्य खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अग्निशमन दल आल्यानंतर आगीवर नियंत्रण आले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाढे फाटा परिसरातील गाळ्यांध्ये विविध प्रकाराच्या व्यवसायाची दुकाने आहेत. एका ठिकाणी जवळजवळ इलेक्ट्रिकल, सलून व प्लंबिंग साहित्य विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास यामधील एका बंद दुकानाला प्रथम आग लागली. त्यानंतर इतर दोन दुकानात आग पोहोचली. या आगीमुळे बंद दुकानातून अचानक धुराचे लोट येऊ लागले. त्यामुळे नागरिकांचे या दुकानाकडे लक्ष गेले.

स्थानिक युवकांनी उपलब्ध होईल त्या पाण्याने आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचबरोबर अग्निशमन दल व पोलिसांनाही माहिती देण्यात आली.आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी आला. त्यानंतर आग विझविण्यात यश आले. तोपर्यंत तीनही दुकानातील साहित्य जळाले होते. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

error: Content is protected !!