सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी तब्बल १४ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम काही दिवसातच सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी रस्त्याची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगिलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, संजय उत्तुरे, उप अभियंता राहुल अहिरे, शाखा अभियंता रवी अंबेकर, जावलीचे उपअभियंता निकम आदी उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चौपदरीकरणाचा सविस्तर आराखडा जाणून घेतला.
राज्य मार्ग ११७ असलेल्या शिक्रापूर, जेजुरी, लोणंद, सातारा या मार्गावरील सातारा शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाढे फाटा ते पोवई नाका या ३.४० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी या दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे, याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या मागणीनुसार वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ना. गडकरी यांनी त्यांच्या खात्यातून भरीव निधी मंजूर केला आहे. मंजूर निधीतून वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासह रस्त्याच्या कडेला आरसीसी गटर बांधणे, या रस्त्यावर असलेल्या पुलांची सुधारणा करणे, रस्त्याच्या मध्ये दुभाजक आदी कामाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसात या कामाला प्रारंभ होणार असून चौपदरीकरणाचे काम करताना रस्त्याच्या दुतर्फा असेलेली मोठी झाडे काढू नका. या रस्त्यावर दररोज सकाळ, संध्याकाळ मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी खास वॉकिंग ट्रॅक करावा तसेच वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी पारंगे चौक, जुना आरटीओ चौक आणि जरंडेश्वर नाका येथे आयलँड तयार करावेत अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
You must be logged in to post a comment.