वाई गांजा प्रकरण : “पोलीस अधिकाऱ्यांच्या नार्को टेस्ट करा”सूत्रधारांना पाठीशी घातल्याचा रिपाइंचा आरोप

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई येथील गांजाच्या शेतीप्रकरणी तपास अपूर्ण असून, प्रमुख सूत्रधारांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप रिपाइंचे सातारा शहराध्यक्ष जयवंत कांबळे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या नार्को टेस्ट घेऊन सत्य समोर आणावे; अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

वाई येथे फेब्रुवारी २०२१ मध्ये गांजाची शेती केल्याप्रकरणी पोलीस विभागाच्या जिल्हा विशेष शाखेकडून कारवाई करण्यात आली होती. यामध्ये जर्मन येथील दोन जणांवर वाई पोलीसांत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी माध्यमांमधून अनेक उलट-सुलट चर्चा छापून आल्या होत्या. त्याअनुषंगाने रिपाइंचे जयवंत कांबळे यांनी गृहमंत्र्यांकडे निवेदन देऊन याप्रकरणी तपास यंत्रणेने सखोल तपास करायला पाहिजे होता आणि मूळ गुन्हेगारांवर कारवाई व्हायला पाहिजे होती अशी शंका निवेदनात उपस्थित केली असून या गुन्ह्याचा तपास अर्धवट आणि मुख्य सूत्रधार यांना पाठीशी घालण्याच्या दृष्टीने झालेला आहे असा आरोप केला आहे.तसेच संबधित जर्मन युवकांवर गोवा राज्यात अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.असे असतांना त्यांना तेथून वाई येथे आणणारा व्यक्ती कोण ? वाई हे शहर शैक्षणिक व सांस्कृतिक विचार जोपासणारे शहर आहे. अशा शहरात त्या युवकांना भाड्याने घर कोणी मिळवून दिले ? त्या युवकांचा घटनेपूर्वी व्हिसा संपलेला होता असे असताना त्यांचा तपास पोलीस यंत्रणेने का केला नाही ? ते युवक वाई पोलीस स्टेशनपासून अगदी जवळ वास्तव्य करत होते, तरी त्याकडे कानाडोळा का केला गेला ? ज्या घरात भाड्याने वास्तव्य होते त्या घराचे लाईट बिल वाढवून येत होते, याबाबत वीज वितरण आणि पोलीस यंत्रणेने सखोल तपास का केला नाही ? असे प्रश्न कांबळे यांनी निवेदनात मांडले आहेत.

दरम्यान,सदर गुन्ह्याशी निगडित आरोपी व संबंधित तपास अधिकारी यांची नार्को टेस्ट करावी, संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासावे, त्याचबरोबर याप्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून सखोल तपास करून मुख्य सूत्रधारास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून याप्रकरणी कारवाई न झाल्यास ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शहराध्यक्ष जयवंत काबंळे यांनी निवेदनात दिला आहे.

error: Content is protected !!