सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – वाई शहरातील मध्यवस्तीतील गणपतीआळी परिसरात दोन दिवसांपूर्वी रात्री चोरटयांनी धुमाकूळ घालत होता. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वाई पोलिसांनी काही तासातच आरोपी मुसक्या आवळल्या. आरोपी ज्या भागात भुरट्या चोऱ्या करून दहशत माजवीत होते. ही दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी हातात बेड्या ठोकून शहरातील रस्त्यावरून या चोरट्यांची धिंड काढली.
वाई शहरात सोमवार दि. 22 च्या मध्यरात्री चोरटयांच्या टोळीने शहरातील मध्यवस्तीत असलेले शशिकांत चंद्रकांत येवले (वय 28, रा. भोगाव, ता. वाई) यांच्या मालकीच्या आम्रपाली बिअरबार व रेस्टॉरंट यांचे बंद शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटून काउंटरमधून 14 हजार 200 रुपये रोख रक्कम तसेच शेजारील सुशांत संतोष गोळे यांचे साई कृपा कृषी केंद्राच्या बंद शटर उचकटून गल्ल्यातील रोख 18 हजार रुपये, बिलाल इकबाल बागवान यांच्या बागवान किराणा स्टोअरमधून 11 हजार रुपये रोख, रविचंद्र प्रदिप भाटे यांच्या भाटे डेअरी या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील 300 रुपये रोख व 3 आईस्क्रीमचे बॉक्स असा 1800 रुपयांचा मुद्देमाल व नितीन रविंद्र शिंगटे यांच्या अष्टविनायक फार्मा दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातून 7 हजार रुपये रोख रक्कम याच चोरट्यांनी लंपास केली होती. तशी तक्रार वाई पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
वाई पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिर्के, कृष्णाराज पवार, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी पथक तयार केले. या पथकाने सीसीटिव्हीच्या माध्यमातून तपास करीत संशयीत सनी सुरेश जाधव (वय 26), अक्षय गोरख माळी (वय 20), सागर सुरेश जाधव (वय 24, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिध्दनाथवाडी, वाई ) तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पाचही दुकाने फोडली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने 17 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली. उर्वरीत रक्कम मिळविण्यासाठी पथक प्रयत्नशिल आहे. चोरटयांच्या या टोळीत आणखी काही नावे पोलीसांच्या तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
शहराच्या मध्यवस्तीमध्ये झालेल्या या चोर्यांमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या टोळक्यावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झालेले आहेत. तरी यांच्यावर पोलीसांनी कठोर कारवाई करून तडीपार करावे अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची वाई शहरातून धिंड काढण्यात येवून व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचे काम करण्यात आले, रात्रीच्या वेळेस शिध्देश्वर पुलावरून जाणाऱ्या लोकांना हे टोळके शस्त्राची भीती दाखवून लुटण्याच्या अनेक घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, ते मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने वाई पोलीस विश्वासास पात्र ठरले आहेत.
You must be logged in to post a comment.