सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : फेब्रुवारी २०२१ मध्ये वाई (जि.सातारा) येथे दोन जर्मन युवक भाड्याने घेतलेल्या घरात गांजा व इतर अंमली पदार्थांची शेती करत असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस विभागाच्या जिल्हा विशेष शाखेस मिळाली होती. त्यानुसार त्यांनी धाड टाकून सर्गीस व्हिक्टर मानका व सेबेस्टीन स्टेन मुलर ह्या दोन जर्मन युवकांवर कारवाई करून वाई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. सध्या ते दोन्ही युवक न्यायालयीन कोठडीत आहेत.मात्र याप्रकरणी पुढील तपास योग्य झाला नसून याप्रकरणाचा केंद्रीय व राज्यस्तरीय संस्थेकडून सखोल तपास करण्याची मागणी रिपाइंचे शहराध्यक्ष जयवंत कांबळे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाई येथील गांजाची शेती या गुन्ह्याचा तपास अर्धवट आणि मुख्य सूत्रधार यांना पाठीशी घालण्याच्या दृष्टीने झालेला आहे. तसे लेख वर्तमानपत्रात देखील छापून आले असून त्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामध्ये संबधित जर्मन युवकांवर गोवा राज्यात अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत.असे असताना त्यांना तेथून कायद्याच्या कचाट्यातून वाई येथे आणणारा व्यक्ती कोण ? वाई हे शहर शैक्षणिक व सांस्कृतिक विचार जोपासणारे शहर आहे. अशा शहरात त्या युवकांना भाड्याने घर कोणी मिळवून दिले ? त्या युवकांचा घटनेपूर्वी व्हिसा संपलेला होता असे असताना त्यांचा तपास पोलीस यंत्रणेने का केला नाही ? ते युवक वाई पोलीस स्टेशन पासून अगदी जवळ वास्तव्य करत होते, तरी त्याकडे कानाडोळा का केला गेला ? ज्या घरात भाड्याने रहात होते त्या घराचे लाईट बिल वाढवून येत होते, ह्याबाबत वीज वितरण आणि पोलीस यंत्रणेने सखोल तपास का केला नाही ?असे असंख्य प्रश्न निर्माण होत असून सबब, त्या युवकांना पाठीशी घालणारा आणि गोवा येथून आणणाऱ्या व्यक्तीला तसेच घर मालकाला पाठीशी घालण्याचे काम स्थानिक पोलीस यंत्रणेने केलेले दिसून येते. त्यासाठी राजकीय आणि आर्थिक पाठबळाचा वापर केल्याची चर्चा आणि शंका उपस्थित केले जात आहे.
याप्रकरणाचा सातारा पोलीस अधिकाऱ्यांनी अर्धवट तपास केला आहे. त्यामुळे ह्या गुन्ह्याशी निगडित सर्व पोलीस अधिकारी यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य गुप्तचर विभाग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांच्यामार्फत तपास करण्यात यावा.अशी मागणी जयवंत कांबळे यांनी निवेदनात केली आहे.
विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी आरोपी पकडले गेले आहेत तेथून कोयना व धोम धरण काही अंतरावर आहे. तसेच वाईपासून काही अंतरावर पाचगणी आणि महाबळेश्वर अशी जागतिक पर्यटनस्थळे आहेत. त्या ठिकाणी जगातून दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. अशावेळी त्या धरणाला आणि पर्यटन स्थळांना आणि परिणामी पर्यटकांच्या जीवाला देखील अशा प्रवृत्तीपासून धोका असू शकतो, हे ओळखून राष्ट्रीय तपास यंत्रणा यांनी ह्या प्रकरणाचा सखोल तपास करून मुख्य सूत्रधार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याचेही कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
You must be logged in to post a comment.