सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : श्रमिक मुक्ती दलाच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात कधीही जाहीर केल्याशिवाय कोणताही कार्यक्रम किंवा आंदोलन, सत्याग्रह केला जात नाही अशी ख्याती आहे. असे असताना आज पाटण तालुक्यातील कोयनानगर या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी येथील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करणे ही बाब अत्यंत वेदनादायक व शासनाची प्रतिमा मलिन करणारी असून शासन आमच्याशी असाच व्यवहार करणार असेल तर आम्हाला या सरकारविषयी वेगळा विचार करावा लागेल असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
अतिवृष्टी झाल्यामुळे पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात दरड कोसळून नुकसान झाले आहे. ढोकवळे, मिरगाव या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या गावात जीवित हानी झाली आहे. तर बाजे येथील अडकलेल्या लोकांना बोटीने बाहेर काढण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय होते. कालपर्यंत श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भर पावसात मदत कार्यात प्रशासन आणि NDRF टीम, यांच्या बरोबर आघाडीवर होते. प्रशासन पोहचू शकत नव्हते तेव्हा ही श्रमिक मुक्ती दलाची टीम पोहोचली होती. या सर्व परिस्थितीत तातडीने मदतकार्य पोहचणे आणि कमीतकमी नुकसान होण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात होते. असे असताना आज मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी मदतकार्यात पुढाकारात असलेल्या कार्यकर्त्याना कोयनानगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवणे आणि मोबाईल काढून घेणे हे राजकीय षडयंत्र असून सत्य परिस्थिती ही मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचू नये, यासाठी रचलेली ही बाब अत्यंत खेदजनक व निंदनीय आसून याचा जाब सरकार मधील वरिष्ठांना विचारला जाईल असा इशाराही डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.
अशा या बाबीमुळे श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते खचून जाणार नसून आज नव्याने पळासरी येथे होत असलेल्या दरड कोसळण्याची घटना घडली आहे, त्या ठिकाणी मदतीसाठी त्याच जिद्दीने व नव्या जोमाने जात आहेत, परंतु कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता असे सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ना उमेद करण्याच्या या षड्यंत्रला श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते भीक घालणार नाहीत. असेही डॉ. भारत पाटणकर शेवटी म्हणाले.
You must be logged in to post a comment.