कण्हेर योजनेचे पाणी अखेर शाहूपुरीत दाखल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शाहूपुरीकरांना वीस वर्षांपूर्वीच पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. येथील नागरिकांना इतकी वर्षे पाण्यापासून का वंचित ठेवण्यात आले? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांर्तगत शाहूपुरी व उपनगरालासंजीवनी ठरलेल्या कण्हेर योजनेच्या उपसा पंपाचे गुरुवारी खा. उदयनराजे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कार्यक्रमास नगरसेवक डी. जी. बनकर, नगरसेवक वसंत लेवे, माजी उपसभापती संजय पाटील, अमित कुलकर्णी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले, प्रकल्प अभियंता सतीश अग्रवाल आदी उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, तब्बल ४२.९८ कोटी रुपयांच्या या योजनेची पूर्तता झाल्याचे आज समाधान वाटत आहे. योजनेचे चलनवलन गतीला येईपर्यंत प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर ही जवाबदारी प्राधिकरणाकडे राहणार असून दोन टप्प्यात ती पालिकेकडे हस्तांतरित केली जाईल. या योजनेत एकूण साडेनऊ हजार नळ कनेक्शन दिली जाणार असून, कनेक्शनचे मागणी फॉर्म प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. कण्हेर योजनेतून चार एमएलडी पाणीउपसा केला जाणार आहे.

error: Content is protected !!