सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कास जलाशयामध्ये दोन महिने पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा आहे. गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत पाण्याची सद्यपरिस्थिती अत्यंत चांगली असली तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करणे टाळावे असे आवाहन सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सभापती सौ सीता राम हादगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
गतवर्षी एप्रिल महिन्यात कास जलाशयात पाण्याची पातळी अत्यंत खालावल्यामुळे सातारा शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सभापती सौ. सीता हादगे, कर्मचारी संदीप सावंत, पाटकरी जयराम किर्दत यांनी कास जलाशयाचा पाहणी दौरा करून सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गतवर्षी याच दिवशी कास जलाशयामध्ये १०.५० फूट पाणी होते. जलाशयातील पाण्याचा मृतसाठा अधिक असल्यामुळे सातारा शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्याची वेळ पालिकेवर आली होती. सद्यपरिस्थितीत जलाशयात बारा फूट पाणी असल्यामुळे दोन महिने पुरेल इतके पाणी जलाशयांमध्ये आहे. १५ जून पर्यंत सातारा शहरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, अशा पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ निर्माण होणार नाही. सध्या असलेला कडक उन्हाळा, पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता हे पाणी १५ जून पर्यंत सहज पुरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गतवर्षी निर्माण झालेली परिस्थिती सध्या निर्माण झाली असती तर मृतसाठा पंपिंगच्या साह्याने उचलून त्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करून ते पाणी पिण्यासाठी द्यावे लागले असते यावर होणारा खर्च फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यावर्षी तो खर्च वाचणार आहे.
कास जलाशयात मुबलक पाणी असले तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन करुन पत्रकात पुढे म्हटले आहे, नळ सुरू ठेवणे, घरगुती वापरासाठी आणलेल्या पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहने असे प्रकार सातत्याने साताऱ्यात घडत आहेत. ज्या भागात पहाटेच्यावेळी पाणी सोडले जाते त्याठिकाणी दुचाकी, चारचाकी, रिक्षा आदी वाहने नळाच्या पाइपच्या साह्याने धुतले जातात, अशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय फार मोठ्या पद्धतीने केला जातो. पाण्याचा अपव्यय असाच सुरू राहिल्यास नाईलाजास्तव पाणी कपात करण्याची कडक भूमिका सातारा नगरपालिकेला घ्यावी लागेल, असा इशाराही सभापती सौ.हादगे यांनी यावेळी दिला.
You must be logged in to post a comment.