श्वासात श्वासात असेपर्यंत आम्ही दोघेही जनसेवेसाठी कटीबद्ध : खा.उदयनराजे

शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ कोंडवेत मोठ्या उत्साहात प्रचारसभा; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यात शिवेंद्रराजे सलग चार टर्म आमदार आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रचंड विकासकामे केली आहेत. मात्र अशा स्थितीत कोणीही येईल आणि त्यांना विरोधासाठी विरोध करत निवडणुकीला उभा राहील. तेव्हा विरोधी उमेदवारांनी आजवर, काय काम केलं? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. त्यामुळे बाबाराजेंना मंत्रिपद मिळण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन, असा शब्द देऊन आमच्या श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही दोघेही तुमची सेवा करत राहू, अशी ग्वाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.

कोंडवे (ता. सातारा) येथे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कोंडवे व लिंब जिल्हा परिषद गटांचा संयुक्त मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी खा. उदयनराजे बोलत होते. मेळाव्याला आ. शिवेंद्रराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लवंगारे, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गोसावी, अनिता चोरगे, संगीता ननावरे, रेश्मा शिंदे, प्रतीक कदम, संदीप शिंदे, नाना शिंदे, पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, धर्मराज घोरपडे, जितेंद्र सावंत, लक्ष्मण कडव, सर्जेराव सावंत, बाळासाहेब चोरगे, सीमा जाधव, नामदेव सावंत यांच्यासह सर्व आजी- माजी पदाधिकारी, पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतींचे सदस्य, सोसायट्यांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवल्या व आपली विकासकामे मार्गी लागली आहेत. शिवेंद्रराजेंनी तर संपूर्ण मतदारसंघात विकासकामांचा झंजावात उभा केला आहे. लोकशाहीमुळे कुणीही निवडणुकीला उभे राहू शकते पण, जनतेसाठी काहीतरी काम केले तरच आपल्याला मते मागायचा अधिकार असतो. मात्र निवडणुकीपुरतेच जनतेत येणाऱ्या विरोधकांनी आजवर किमान जनसंपर्क तरी ठेवायचा होता, असा टोला खा. उदयनराजेंनी विरोधी उमेदवाराला लगावला.

आ.शिवेंद्रराजे म्हणाले, कर्तव्यशून्य आणि इच्छाशक्ती नसलेल्या विरोधी उमेदवाराने आजवर तुमच्यासाठी काय केलं आहे? माणसं सोडा त्यांना मतदारसंघातील साधी गावंसुद्धा माहित नाहीत. मतदारसंघात आम्ही केलेल्या गुळगुळीत रस्त्याने आता गावागावात ते फिरत आहेत, आणि “कुठे आहे विकास?” असा सवाल ते विचारत आहेत. आपण एवढे रस्त्यांचे जाळे विणले आहे की, एखाद्या गावात गेल्यावर दुसऱ्या गावात कुठला रस्ता जातो, हेही त्यांना कळत नाही. विरोधक असे आहेत की, त्यांच्यावर बोलण्यासारखं काहीच नाही. मी केलेल्या विकासकामांची पोचपावती जनता मला विक्रमी मतांनी विजयी करून देणार आहे. जे उद्धव ठाकरे गटातील कट्टर, सच्चे शिवसैनिक आहेत, त्यांनी त्या उमेदवाराकडून आत्ताच प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे. कारण, २३ तारखेच्या निकालानंतर हे पार्सल पुन्हा अजिदादांच्याच राष्ट्रवादीत परत जाणार आहे. माझा जनतेवर पूर्ण विश्वास असून सातारा- जावलीतील जनता मला विक्रमी मतांनी विजयी करेल, असा विश्वास आ. शिवेंद्रराजेनी व्यक्त केला.

यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांसह महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली. हात उंचावून आम्ही सर्वजण शिवेंद्रराजेंच्या विजयासाठी कटिबद्ध असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

error: Content is protected !!