सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गटबाजी आणि राजकारणामुळे आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. या पराभवाचं खापर त्यांनी माझ्यावर फोडू नये. तुम्ही कितीही वातावरण तापवले तरी तुम्हाला थंड करुन घरी बसवण्याची ताकद आमच्यात आहे, असा जळजळीत इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आ. शशिकांत शिंदे यांना दिला.
सुरुची बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे म्हणाले, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगता तर सौरभ शिंदे, प्रविण देशमाने यांचे पराभव का झाले? पं.स. सदस्या अरुणा शिर्के यांच्याविरोधात अपात्रेच्या तक्रारी करणारी माणसं कुणाची होती? गटबाजी करायला जावली का दिसते? पाटण, माण, खटाव तालुक्यात राष्ट्रवादीच्या सीट्स पडल्यात. त्याठिकाणी का पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत नाही? संघर्षासाठी आमची तयारी आहे.त्यांनी यापूर्वीही जावलीत लक्ष घातले होते. आगामी सर्व निवडणुका आम्ही आमच्या ताकदीवर लढणार आहोत.
जिल्हा बँकेची मागील निवडणूक झाली त्यावेळी चेअरमनपद देण्याबाबत राष्ट्रवादी कार्यालयात प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी एका वर्षासाठी चेअरमनपद द्यावे, अशी चर्चा झाली. त्यावेळी पाच वर्षांसाठी चेअरमनपद द्यावे, अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी पाच वर्षे चेअरमनदाच्या मागणीला विरोध केला होता, असे शिवेंद्रराजेंनी सांगितले.
You must be logged in to post a comment.