सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात विकेंड लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शनिवार-रविवारी लॉकडाऊन लागू असेल. मात्र, या काळात अत्यावश्यक सेवांना मुभा असेल. वीकेंड लॉकडाऊन दरम्यान नेमकं काय सुरु आणि काय बंद असेल याबाबत अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा शहरात फेरफटका मारून आढावा घेतला.
राज्यात मिनी लाॅकडाऊन केल्याने सर्वसामान्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी निवेदन केले. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने 4 आणि 5 एप्रिल रोजी निर्बंधांबाबत आदेश जारी केले आहेत. जी दुकाने, मॉल्स आवश्यक / जीवनावश्यक वस्तू विक्री करीत आहेत ते सुपर मार्केट्स, मॉल्स सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहू शकतील. आवश्यक नसलेल्या वस्तूंचे विभाग बंद राहतील. ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही, असे सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच जिल्हाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक अंमलबजावणी करावी. त्यास विरोध करणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
You must be logged in to post a comment.