सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रुग्ण मोठया प्रमाणात आढळत असल्याने सातारा शहर व सातारा तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी तथा इंसिडन्ट कमांडर मिनाज मुल्ला यांनी कळविले आहे.
कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर आता जिल्हाधिकाऱ्यांनीही ३० एप्रिलपर्यंत सुधारित निर्बंध लागू केले आहेत. यानुसार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, बाजारपेठ, मॉल्स बंद राहणार आहेत. तसेच वाहतुकीबाबतही नियम घालून दिले आहेत. तर जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने निर्बंध वाढविणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवारी रात्री आठपासून ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कालावधीत सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास किंवा जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तर उर्वरित कालावधीत म्हणजे सोमवार ते गुरुवार या दिवशी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी आहे
दरम्यान, भाजी मंडईमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने सातारा शहर आणि तालुक्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच याबाबत स्थानिक प्राधिकरण तसेच पोलीस विभाग यांनी योग्य ती कार्यवाही करावी. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदी नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सातारा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.