जिल्हा परिषदेचे अभ्यास दौरे नेमके कशासाठी? : महारुद्र तिकुंडे यांचा प्रशासनाला सवाल

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा कोरोना संसर्गाच्या पाशातून आताशी कुठे बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच अस्मानी संकटाने सर्वसामान्यांचे आणि शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आशेने प्रशासनाकडे पाहत असतानाच सातारा जिल्हा परिषदेने लाखो रुपयांची उधळपट्टी करीत सो कॉल्ड अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या अनाठायी खर्चाविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा राज्य फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.


निवेदनात असे म्हटले आहे की, सातारा जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक वर्षी विविध विभागांचे अभ्यास दौरे आयोजित केले जात होते. परंतु मागील दोन वर्षांपासून देशावर व राज्यावर कोरोना महामारीचे संकट कोसळल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने असे अनाठायी होणारे खर्च थांबवून ते आरोग्यावर खर्च करण्याचे निर्देश दिलेले आहेत व तसे अध्यादेश संबंधित विभागांना पारीत केलेले आहेत. मग सातारा जिल्हा परिषद याला अपवाद कशी आहे? हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडलेला आहे.
चालूवर्षी बांधकाम विभाग, समाजकल्याण विभागाने लाखो रूपये चालू वर्षी लाखो रुपये खर्च करून अभ्यास दौरे कशासाठी काढले? या दौर्‍यावर लाखोंचा चुराडा कशासाठी? या अभ्यास दौर्‍यांचा सातारकरांना फायदा किती होणार आहे? हा एक संशोधनाचा विषय आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनाठायी खर्च बंद करणे हे अभिप्रेत असताना सातारा जिल्हा परिषदेला याचा विसर कसा पडला? जिल्ह्याला निधीची कमतरता भासत असल्यामुळे सर्व विभागाने विकास निधी कमी केलेले आहेत. मग या दौर्‍यासाठी लाखोंची तरतूद कोणाच्या फायद्यासाठी केली गैली?
सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन जिवाचे रान करीत आहे. वेगवेगळ्या मार्गातून निधी संकलन करून विविध प्रकारच्या आरोग्य विषयक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोविड आजाराने जवळपास पाच हजारांच्या वर मृत्यू झालेले आहेत. मृतांच्या वारसांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी 50 हजार रूपये तात्काळ देण्यात यावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले असून अद्यापही या आदेशाची अंमलबजावणी सातारा जिल्हा प्रशासनाने केलेली नाही.
असे असताना सातारा जि. प. सदस्यांचा हा चंगळवाद सातारकर कदापी सहन करणार नाहीत. त्यातच जिल्ह्यामध्ये वादळी पावसाने हाहाकार माजविल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी मेताकुटीस आला आहे. या अशा आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये समाजाला व शेतकर्‍यांना अभ्यास दौर्‍याची नव्हे तर आधाराची गरज आहे. हे सर्व प्रतिनिधी विसरून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सातारा जिल्हावासिय व शेतकरी या अभ्यास दौर्‍यामुळे प्रतिनिधींवर मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व यामध्ये म्हणजेच अभ्यास दौर्‍यासाठी विनाकारण खर्चाची तरतूद करणार्‍या अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येवून तरतूद केलेली रक्कम रद्द करण्यात यावी. जर तशी रक्कम खर्ची टाकली गेली असल्यास किंवा टुरिस्ट कंपनीस दिली गेली असल्यास ती सर्व रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी.
कोरोना व ओला दुष्काळ सदृश्य परिस्थितीतून सातारा जिल्हावासिय जात असताना सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी अभ्यास दौर्‍यावर जात आहेत. याचा निषेध म्हणून विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने अध्यक्ष दालनास टाळेठोक आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहिल याची नोंद घ्यावी. तरी संबंधितांवर खर्च वसूली कामी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा राज्य फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.
हे निवेदन देताना कपिल राऊत, नंदकुमार जावळे, हणमंत शिंदे, नागेश शिंदे यांचीही उपस्थिती होती. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी, सातारा पोलिस अधिक्षक यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

error: Content is protected !!