वाई मतदारसंघातील हुकूमशाहीला गाडणारच : पुरूषोत्तम जाधव

शिवसेना पक्ष सदस्यत्वासह नियोजन मंडळाचा ‘वर्षा’वर जाऊन दिला राजीनामा

सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : सलग २० वर्षे महायुतीचे एकनिष्ठेने काम करूनही केवळ आम्ही सर्वसामान्य शेतकरी घरातील आहोत म्हणून आम्हाला उमेदवारीसह सत्तेपासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळे आपण शिवसेना जिल्हाप्रमुख व पक्ष सदस्यत्वासह जिल्हा नियोजन मंडळाच्या पदाचा राजीनामा देत आहोत. तसेच वाई विधानसभा मतदारसंघातील हुकूमशाहीला गाडल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, श्री. जाधव हे सोमवार दिनांक २८ रोजी वाई- खंडाळा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘भूमिशिल्प’शी बोलताना श्री. जाधव म्हणाले की, गेले दोन दशके मी कायम युतीशी एकनिष्ठ राहिलो आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारात वाढलेला मी कडवट शिवसैनिक आहे. नेत्यांच्या आदेशानुसार दोन वेळा लोकसभा आणि दोन वेळा विधानसभा निवडणुका लढवल्या. त्यानंतर निवडणूक लढवण्याची तयारी असूनही सातत्याने मला थांबवण्यात आले. मला निवडणूक लढण्यापासून परावृत्त करताना दिलेले कोणतेही आश्वासन पाळण्यात आले नाही. आम्हाला घराणेशाहीचा वारसा नसला तरी आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहोत. म्हणूनच आम्हाला थांबवण्यात येत आहे, मात्र या गळचेपीविरुद्ध मी संघर्ष करणार आणि या निवडणुकीत वाई मतदारसंघातील हुकूमशाहीला गाडणारच असून वाईमध्ये इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊन पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदासह पक्ष सदस्यत्व आणि शिवसेनेमुळे मिळालेल्या जिल्हा नियोजन सदस्यत्वाचा राजीनामा लेखी स्वरुपात मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतर्फे चार वेळा वेगवेगळ्या निवडणुका लढवलेल्या जबाबदार नेत्याने राजीनामा दिल्याने शिवसैनिकांसह जनतेमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. श्री. जाधव यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वाई मतदारसंघासह जिल्ह्यातील प्रमुख लढतींवर निश्चितच परिणाम होणार आहे.

error: Content is protected !!